महाराष्ट्र सारख्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसेल, तर या राज्यात रोज खून होतील, रस्त्यावर मारामाऱ्या होतील; संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरला बंदी घालण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात हल्ला झाला. यावर महाराष्ट्र सारख्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसेल तर या राज्यात रोज खून होतील, रस्त्यावर मारामाऱ्या होतील; असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी, त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी गृहखात्याचा वापर होतो अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी पुणे ते कोल्हापूर प्रवास करावा मग त्यांना कळेल की रस्त्याचं जाळं किती चांगलं आहे ते. इथे कशाला. कालच मी नवी मुंबई विमानतळावरून आलो, घरी पोहोचायला अडीच तास लागले, हे देवेंद्र फडणवीस यांचे इन्फ्रास्ट्रक्चर. पत्रकारांनी भाजपवर तरी का विश्वास ठेवावा. भाजपचा खेळ संपलेला आहे. 2029 च्या आधीच भाजपचा खेळ संपणार आहे पहा तुम्ही, असे संजय राऊत म्हणाले.

गणेशोत्सवात डीजे वाजवण्याच्या बाबतीत संजय राऊत म्हणाले की, नागपूरमध्ये आयुक्तांनी सांगितलं की शहरात डीजे आणि लेझर बंद करणार. पुण्यातही त्याच सरकारचं राज्य आहे. नागपुरचे पुर्वीचे आयुक्त पुण्यात आहेत. मग ते का भूमिका घेत नाहीत. मुळात हा धोरणात्मक निर्णय एका शहराचा निर्णय नाही. या राज्यामध्ये डीजे आणि लेझरमुळे लोकांचं आरोग्य बिघडत असेल आणि मुलांच्या परीक्षांवर परिणाम होत असेल तर हा धोरणात्मक निर्णय घेण्याची हिंमत या राज्याच्या गृहमंत्र्यांमध्ये नाही. ते डरपोक आहेत. फडणवीस म्हणाले की कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेऊ हे कधीपासून कायदा पाळायला लागले. हजारो पुणेकर डेक्कनच्या चौकात जमले आणि डीजेला विरोध केला. नागपूरमध्येही तेच होतंय, अनेक शहरांत तिथल्या नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे. सरकार हे लोकशाहीवादी असेल, लोकभावनेचा आदर करणारे असेल. तुम्ही कॅबिनेटमध्ये दलालीचे, कमिशनबाजीचे 100 निर्णय घेता, मग लोकांच्या भूमिकेवर का निर्णय घेत नाहीत. नागपुरात वेगळा निर्णय, पुण्यात वेगळा निर्णय, मुंबईत वेगळा निर्णय याला कायद्याची चौकट नाही म्हणत मिस्टर देवेंद्र फडणवीस, असेही संजय राऊत म्हणाले. .

विद्यानंत बापट यांच्या झालेल्या हल्ल्याबात संजय राऊत म्हणाले की, या राज्यात कुठल्याही प्रकराची कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं गृहखातं कशाकरता आहे असा प्रश्न पडतो. या राज्यातल्या कोणत्याही प्रश्नावर गृहखात्याची कुठलीही भूमिकाच नाही. आदेश नाहीत, सूचना नाहीत. फक्त आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी, त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी गृहखात्याचा वापर होतो. भर रस्त्यावर एका आंदोलकाला ऑन कॅमेरा मारहाण होते, याचा अर्थ कायद्याची भिती राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस हे पूर्णवेळ गृहमंत्री नाहीत हे त्यांनाही माहित आहे. आता ते पूर्णवेळ राज्याचे मुख्यमंत्रीही म्हणून काम करत नाहीत, इतका गोंधळ त्यांच्या सरकारमध्ये सुरू आहे. महाराष्ट्र सारख्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसेल तर या राज्यात रोज खून होतील, रस्त्यावर मारामाऱ्या होतील, असेही संजय राऊत म्हणाले.

महायुतीच्या नेत्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं. त्यावर संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आमचे नेते होते आता उद्धव ठाकरे आहेत. आम्ही कधीही दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी किंवा प्रमोद महाजनांना भेटायला गेलो नव्हतो. ते मातोश्रीत भेटायला यायचे. शिवसेनेसोबत चर्चा करायला हे नेते यायचे. स्वतःला शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांची ही नवीनच जडणघडण मला दिसते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.