पंतप्रधान नरेंद्र मोदी इतकं खोटं बोलतात, की देशालाही त्यांनी खोटं ऐकण्याची सवय लावली – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तानमध्ये जाऊन देशाची जीडीपी वाढली याबाबतचा एक रील बनवला होता. त्यावर पंतप्रधानांची जागतिक ओळख थापेबाज अशी आहे असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इतकं खोटं बोलतात की देशालाही त्यांनी खोटं ऐकण्याची सवय लावली अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, देशाचे पंतप्रधान एखादा दावा करतात तेव्हा खरं म्हणजे पंतप्रधानांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास असायला पाहिजे. पण दुर्दैवाने या पंतप्रधानांची जागतिक ओळख थापेबाज अशी आहे. ते खोटं बोलतात. इतकं खोटं बोलतात की देशालाही त्यांनी खोटं ऐकण्याची सवय लावली आहे. पण आता गेल्या काही काळापासून देशातलं चित्र बदलत आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा खोटेपणा लोकं स्विकारत नाही. या देशाचा जीडीपी वाढलाय म्हणजे नेमकं काय झालंय? हे स्वतः या देशाच्या पंतप्रधानांना तरी सांगता येईल का? देशाचा जीडीपी वाढला म्हणजे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली. ते आकडे सांगतात पाच ट्रिलियन वगैरे. हे आमच्या आकलनापलीकडे आहे. आम्हाला इतकंच माहित आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. गेल्या दोन वर्षात साडेसात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे काय जीडीपी वाढल्याचे लक्षण आहे का? या देशातली 85 कोटी जनता आजही नरेंद्र मोदींनी फेकलेल्या 10 किलो अन्नावर जगत आहे. हे जीडीपी वाढल्याचे लक्षण नाही. आपण दरवर्षी सांगता की आम्ही दोन कोटी रोजगार देऊ. आतापर्यंत किती रोजगार निर्माण झाले? कोट्यवधी बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या सुरू आहेत. निवडणूक आली की लाडक्या बहिणीला तुम्ही दीड हजार रुपये देणार बिहारमध्ये 10 हजार रुपये दिले. यातून मतं विकत घेतली. हे जीडीपी वाढल्याचे लक्षण अजिबात नाही. जेव्हा जीडीपी वाढला असे आपण म्हणतो तेव्हा या देशातल्या जनतेचं राहणीमान, या देशातल्या शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य, या देशातल्या सुशिक्षतांना नोकऱ्या मिळतात तेव्हा देशाचा जीडीपी वाढला असं म्हणतात. पण यापैकी या देशामध्ये काहीच झालं नाही. या देशामध्ये पेपर फुटत आहेत, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, रस्त्यावर खड्डे आहेत. याला जर जीडीपी वाढला असं पंतप्रधानांना वाटत असेल तर मग जीडीपीचा व्याख्या जागतिक स्तरावर बदलली पाहिजे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

आपण नॉनबायोलॉजिकल आहोत असे विधान एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा जन्मच आभासी आहे. त्यांचा जन्म आपल्यासारखा आईच्या पोटातून नाही झाला, असं तेच म्हणतात. ते विष्णूचे 13 वे अवतार असून नॉनबायोलॉजिकल आहेत. या आभासी दृष्टीत त्यांना आणि त्यांच्या भक्तांना आनंद मिळतो. भक्त पण खूप आहेत, म्हणून राम रहिला सतत पॅरोल मिळत असतो. त्यामुळे लोक आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. उझबेकिस्तानमध्ये जाऊन रात्री बारा वाजता रील करून पंतप्रधान सांगतात की देशाचा जीडीपी वाढला. हे देशात येऊन सांगा ना. एक पत्रकार परिषद घ्या आणि आकडेवारी जाहीर करा, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.

राष्ट्रीय राजकारणात उलथापालथ होण्याची जास्त शक्यता मला वाटते. पंतप्रधान मोदींना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल करायचे आहेत ते करू शकत नाहीत. कारण त्यांच्या पक्षात आणि सरकारमध्ये बंडाळ्या सुरू झाल्या आहेत. जेव्हा कॅबिनेटमध्ये रीशफल करायचं असतं तेव्हा मंत्र्यांचे राजीनामे घ्यायचे असतात. पण चार वरिष्ठ मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आहे. हे मंत्री आता आलेले नाहीत. हे मंत्री म्हणाले की आधी अमित शहांचा राजीनामा घ्या, तिथून सुरूवात करा असे हे मंत्री मोदींना म्हणालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी भूमिका आहे की या फेरबदलामध्ये उपपंतप्रधान पद निर्माण करा आणि एक तरुण तडफदार संघाच्या विचारांना मानणारा त्या पदी नेमा. ही व्यक्ती पुढला वारसदार असेल. या पदी अमित शहा त्यांना नकोयत. अमित शहांचा खेळ संपलेला आहे. तर ही भाजप अंतर्गत घडामोड आहे. मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. तुमच्या मनात जर देवेंद्र फडणवील असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. फडणवीसांनी दिल्लीत उच्च पदावर जावं ही फक्त एकनाथ शिंदेच नव्हे तर महाराष्ट्राची इच्छा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं कारण त्यांचे पक्षाचे प्रमुख दिल्लीत आहेत. त्यांचे पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्यांचे हायकमांड दिल्लीत आहेत. आमचे हायकमांड बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर होते. उद्धव ठाकरे मातोश्रीत आहेत, आमच्या पक्षाला दिल्लीत जावं लागत नाही. शिवसेना ही मातोश्रीत आणि शिवसेना भवनातून काम करते. पण ज्या पक्षाची स्थापना अमित शहांनी केली आहे असे दोन पक्ष महाराष्ट्रात आहेत. एक अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरा मिंध्यांचा गट. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे आदेश घेण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं लागतं, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

शक्तीपीठाच्या बाबतीत शिवसेनेने बाधितांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही घेत आहात. आधीचे रस्ते जे केले आहेत ते बघा तुम्ही. आणि या शक्तीपीठाची खरच तुम्हाला गरज आहे का? फक्त ठेकेदारांकडून हजारो कोटी रुपये काढण्यासाठी कामं काढली जात आहे. बाकी यात विकास, लोकहित, लोककल्याण काहीही नाही, असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.