
सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेअर बाजारात सुरुवातीची तेजी दिसून आली. सेन्सेक्स जवळपास ६०० अंकांनी, तर निफ्टी ७६ अंकांनी वधारला. आयटी सेक्चरमधील तेजीमुळे शेअर बाजारात ही वाढ झाली. या तेजीमुळे गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या सत्रात २.७२ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला.
गुरुवारी निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. निफ्टी ५० ४१ अंकांनी, म्हणजेच ०.१७% ने घसरून २३,८७३ अंकांवर बंद झाला, तर सेन्सेक्स ४१७.४९ अंकांनी, म्हणजेच ०.५५% ने घसरून ७६,१५२.८६ अंकांवर बंद झाला. तथापि, व्यापाराची शेवटची २० मिनिटे बरीच अस्थिर होती, सीएएस सत्रादरम्यान सेन्सेक्समध्ये २,१०० अंकांची चढ-उतार झाली.
अल्ट्राटेक सिमेंट १.९२% वाढीसह सर्वाधिक वाढलेला शेअर होता, तर टीसीएस १.६०%, बजाज फिनसर्व्ह १.५१%, ट्रेंट १.४८% आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज १.४०% वाढले. भारती एअरटेल ०.१२% ने घसरला, तर एशियन पेंट्समध्ये फारसा बदल झाला नाही.
शुक्रवारी आशियाई बाजारपेठा तेजीने उघडल्या. दक्षिण कोरियाचा कोस्पी १.३% ने वाढला. जपानचा निक्केई २२५ ०.२५% ने वधारला. ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स २०० सुरुवातीच्या व्यवहारात ०.१४% ने किंचित वाढला.



























































