
`मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरो न कोय’ असे म्हणत मीराबाईंच्या अभंगांचा वारसा आपल्या मधुर वाणीने समृद्ध करणाऱया संत रत्नावली. त्या दिवसरात्र कृष्णभक्तीत तल्लीन असायच्या. त्यांची ही भक्तीची ओढ त्यांना सर्वसामान्य लोकांच्यात घेऊन गेली. आपली स्वतंत्र विचारसरणी जोपासत संत रत्नावली यांनी आंबेरच्या राजकुमाराशी लग्न केले होते. मात्र हे राजघराण्यातील नियमांना अनुसरून नव्हते. रत्नावली गोरगरीबांना मदत करीत. गावातील प्रत्येक मंदिरात कृष्णाची महती सांगून लोकांना भक्तीचा लळा लावणाऱया संत रत्नावलींना शेवटी माधवसिंहांनी राजकोठडीत बंदिस्त केले. मात्र तरीही त्यांची कृष्णभक्ती कमी झाली नाही. रत्नावली यांची ही भक्ती पाहून धास्तावलेल्या राजाने कोठडीत त्यांच्यावर भुकेला वाघ सोडला. परंतु रत्नावली भजनात इतक्या रंगून गेल्या होत्या की, त्यांनी वाघालाही कृष्णस्वरूप मानले अन् तो वाघ संत रत्नावली यांच्या पायांशी नतमस्तक झाला. त्यांच्या कृष्णभक्तीत पुढे कुणीच कधीच बाधा आणली नाही.






























































