
>> डॉ. मंजिरी भालेराव
प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासाचा अभ्यास करताना सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांच्या संघर्षाचा उल्लेख हमखास होतो. हा राजकीय पट त्रिरश्मी पर्वतावरील पांडवलेणींमधील शिलालेखांमध्ये अजरामर झाला आहे.
त्रिरश्मी पर्वतावरील पांडवलेणी नावाने प्रसिद्ध असलेली शैलगृहे पाहत असताना तेथील शिलालेखांची माहिती घेणे अनिवार्य आहे. एकूण 24 शैलगृहे आणि 27 लेख असलेला हा समूह तेथील ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या शिलालेखांमुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासाचा अभ्यास करताना सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांच्या संघर्षाचा उल्लेख हमखास होतो. त्या सर्व नाट्यमय घडामोडी नाशिक येथील शैलगृह क्रमांक 10 आणि 3 मधील शिलालेखांमध्ये अजरामर झाल्या आहेत. इ.स.च्या पहिल्या शतकात महाराष्ट्रातील प्रस्थापित सातवाहनांच्या राज्याला गुजरातमधील पश्चिमी क्षत्रप नहपान या क्षहरात घराण्यातील शक राजाने पराभवाचे मोठे धक्के दिले. पश्चिमी महाराष्ट्राचा किनारपट्टीसकट सगळा प्रदेश ताब्यातून गेल्यामुळे सातवाहनांना पार मराठवाडा आणि आंध्र प्रदेशात जावे लागले. इकडे नहपानाने आपले बस्तान नाशिक, जुन्नर, कार्ले आणि कोकणात बसवून या स्थळांच्या आसपासचा सर्व घाटवाटा असलेला प्रदेश जिंकून त्यामधला व्यापार काबीज केला. येथील शैलगृहसमूहात त्यांच्या काळात नवीन निर्मिती होऊन त्याच्या जावयाने आणि अमात्याने त्यामध्ये शिलालेख कोरून त्यांचा पराक्रम आणि लोकोपयोगी कार्य चिरंतन केले.
गौतमीपुत्र सातवाहन या राजाने आपल्या झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी या परकीय राजाविरुद्ध अनेक स्थानिक राजांना गोळा करून नाशिकजवळील गोवर्धन या गावाजवळील रणभूमीवर तुंबळ युद्ध करून नहपानाचा क्षहरात वंश ‘निरवशेष’ केला. तिथूनच म्हणजे ‘गोवर्धनाच्या विजयस्कंधावारा’तून त्रिरश्मी पर्वतावर विहार निर्माण करण्यासाठी दानही दिले. इतकेच नाही तर नहपानाची चलनातील चांदीची नाणी गोळा केली आणि त्यावर स्वतःचे नाव आणि चिन्ह पुनर्मुद्रांकित केले. अशी जवळजवळ 9000 पेक्षा जास्त नाणी नाशिकजवळच्या जोगळटेम्बी या गावातील शेतात सापडली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संघर्षाची कहाणी गौतमीपुत्र सातकर्णी याचा मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुमावी याने लेणे क्रमांक 3 मध्ये एका शिलालेखाच्या स्वरूपात लिहून ठेवली आहे. ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेतील या सर्व लेखांमुळे प्राचीन भारतीय इतिहासातील या महत्त्वाच्या घटना समजण्यास खूप मदत झाली.
भारतीय परंपरा असे मानते की नहपानाला हरवल्यावर शालिवाहन म्हणजे सातवाहन या राजाने शक राजांचा पराभव करून चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला शालिवाहन शक नावाने प्रसिद्ध असलेला संवत्सर सुरू केला. नहपानाच्या मृत्यूनंतर त्याचे गुजरातमधले राज्य सातवाहनांनी घेतले नाही. पण कार्दमक नावाच्या पश्चिमी क्षत्रप घराण्यातील चष्टन या राजाने गादीवर आल्यावर एक संवत्सर स्थापन केला. पुढे त्याच्या वंशजांनी तो 300 पेक्षा जास्त वर्षे वापरला. म्हणून त्याला ‘शक संवत्सर’ असे म्हणतात. सातवाहनांनी तो कधीच वापरला नाही. हा सगळा इतिहास नाशिक आणि कार्ले येथील शैलगृहात असलेल्या शिलालेखांवरून उलगडतो.
नाशिक येथील लेणे क्रमांक 10 मध्ये नहपानाच्या जावयाचा म्हणजे दक्षमित्रेचा नवरा उषवदात याचा त्याने केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती सांगणारा शिलालेख आहे, याच आशयाचा त्याचा शिलालेख कार्ले येथील चैत्यगृहातही आढळतो. नाशिक आणि कार्ले येथील शिलालेखांवरून असे लक्षात येते की, यवन आणि शक यांनी स्थानिक लोकांच्या बरोबरीने दानधर्म केला होता. कदाचित नहपानाचे राज्य चालू असताना या परदेशी व्यापाराला जास्त चालना मिळाली असावी आणि अनेक परदेशी व्यापारी या काळात महाराष्ट्रात जात येत असावेत. नाशिक येथील शैलगृहांची निर्मिती इ.स. 6 व्या – 7 व्या शतकापर्यंत चालू होती. पण या काळातील फारसे शिलालेख उपलब्ध नाहीत. बुद्ध आणि विविध बोधिसत्त्व यांच्या बऱयाच शिल्पांची निर्मिती या काळात झाली. इ.स.च्या 10व्या -11 व्या शतकानंतर, जेव्हा बौद्ध भिक्षू इथे राहत नव्हते तेव्हा काही जैन शिल्पंही इथे कोरली गेली.
नाशिकसारखेच आणि साधारण एकाच कालखंडात तयार झालेले एक अतिशय महत्त्वाचे स्थळ म्हणजे लोणावळ्याजवळचे कार्ले. आज जरी एकविरा देवीमुळे प्रसिद्ध असले तरी प्राचीन काळी हे ठिकाण बहुदा संपूर्ण भारतात सर्वात उत्कृष्ट चैत्यगृह असलेले स्थळ म्हणून कदाचित प्रसिद्ध असावे. या ठिकाणी असलेल्या अनेक शिलालेखांपैकी एक आहे तो म्हणजे वैजयंती म्हणजे आजचे कर्नाटकातील बनवासी येथील भूतपाल नावाच्या श्रेष्ठीचा. हे चैत्यगृह अनेक लोकांनी दिलेल्या दानातून तयार झाले होते. या चैत्यगृहात साधारणपणे 300 पेक्षा जास्त लोक मावतील एवढी जागा आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या आकाराच्या चैत्यगृहात याचा वरचा क्रमांक लागतो.
कार्ले येथील संघाचे नाव ‘वालुरक’ असे होते असे येथील शिलालेखातून समजते. ‘महासांघिक’ नावाच्या बौद्ध धर्माच्या एका महत्त्वाच्या पंथाचे हे महत्त्वाचे केंद्र होते हे यावरून लक्षात येते. येथील लेखात ‘मामल’ असा या प्रांताच्या नावाचा उल्लेख येतो. आजच्या ‘मावळ’ या शब्दाचे हे मूळ रूप असावे असे वाटते. कार्ले येथील चैत्यगृहात असलेल्या जवळ जवळ प्रत्येक स्तंभावर एक कोरीव लेख आहे. त्यापैकी अनेक लेख हे यवन उपाधी लावलेल्या लोकांचे आहेत. बरेचसे यवन हे ‘धेनुकाकट’ या गावाहून आलेले होते, असेही या लेखात नमूद केले आहे. हे गाव नेमके कुठे आहे यावर बराच काळ मतभेद होते, पण डेक्कन कॉलेजच्या डॉ. श्रीकांत प्रधान यांनी डहाणू परिसरात हे असावे असे मत मांडले आहे आणि ते बऱयाच संशोधकांना मान्य आहे.
मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे ग्रीक संस्कृतीमधून आलेल्या ‘स्फिन्क्स’ या काल्पनिक प्राण्याचे अंकन कार्ले येथील चैत्यगृहातील स्तंभावर पाहायला मिळते. या चैत्यगृहातील छताला लावलेल्या लाकडी तुळया या मूळच्या आहेत तसेच स्तूपावर असलेला लाकडी छत्रदंड आणि त्यावरचे छत्रसुद्धा इ.स.पूर्व 1ल्या शतकातले आहे. संपूर्ण भारतात हा अशा प्रकारचा एकमेव पुरावा आजही शिल्लक आहे. या छत्रावर खालच्या बाजूने कमळाचे कोरीव काम आहे तर छत्रदंडावरसुद्धा नक्षीकाम आहे.
अशाच काही महत्त्वाच्या स्थळांची माहिती पुढच्या लेखात घेऊ आणि या मालिकेला विराम देऊ.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)






























































