कल्ट सिनेमा – कल्टचे सीमोल्लंघन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सोहम पिंगळीकर

[email protected]

डबिंग वा रिमेक झालेल्या काही सिनेमांचा प्रवास फक्त भाषिक न राहता, त्यातून एक नवी कलाकृतीच तयार होते. इतर भाषेतील प्रेक्षकांना भुरळ घालत तयार झालेला हा स्वतंत्र सिनेमा कल्ट कायम लोकप्रिय ठरतो.

परवा गप्पा मारताना मी सहज एका मित्राला टोमणा मारला. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, “तेरी जबान बहुत चलती है, सूर्या…” आणि त्याचा डायलॉग ऐकून मी म्हणालो, “हाथ ज्यादा चलता है.” फाडफाड आमच्यात संवादांची फैर झडू लागली. “मेरी पावर को मत भूल तू.” “मुझे याद रखने की जरूरत नहीं.” “मुझसे हाथ मिला ले.”, “गद्दार से दोस्ती नहीं करता.” “मारा जाएगा.” “अपनी सोच.” “इतना गुरूर ठीक नहीं…” आणि शेवटी आम्ही दोघांनी मिळून डायलॉग मारला, “सर पर कफन बाँधने वाले मौत से नहीं डरते. अब निकल यहाँ से.” इतकं म्हणून आम्ही खळखळत हसू लागलो.

साऊथचे सिनेमे बघणाऱया कोणालाही वर दिलेला डायलॉग ओळखायला अडचण येणार नाही. सूर्याभाई आणि फिरोज यांच्यातली टशन दाखवणारा हा संवाद ‘डॉन नंबर वन’ या सिनेमातला आहे. 2007 मध्ये तेलुगूमध्ये हा सिनेमा आला आणि या सिनेमामुळे संपूर्ण उत्तर भारतामध्ये नागार्जुनाला सूर्याभाई म्हणून ओळखलं जाऊ लागलं, पण एका तेलुगू सिनेमातला सूर्या आमच्या मराठी संभाषणात इतका सहज कसा आला? डबिंगकडे आपण सहसा भाषांतर म्हणून पाहतो. तेलुगूचं हिंदी केलं की झालं, पण ही प्रक्रिया इतकी साधी नसते. एक सिनेमा भाषा बदलून येताना त्यात अनेक बदल होतात. सिनेमाने प्रदेश ओलांडला की, त्याला एक नवा प्रेक्षकवर्ग मिळतो आणि त्यांच्यासोबत नवे सांस्कृतिक संदर्भही येतात. पण प्रत्येक सिनेमा असा प्रवास करू शकत नाही. एखाद्या चित्रपटात स्थानिक राजकारण, भाषिक विनोद, एखाद्या प्रदेशाची सांस्कृतिक गंमत किंवा विशिष्ट बोलीवर उभे असलेले प्रसंग असतील, तर त्यांचं दुसऱया भाषेत रूपांतर करणं अवघड होऊ शकतं. पण ‘डॉन नंबर वन’मध्ये असली काहीही प्रादेशिक भानगड नाही. हीच गोष्ट ‘इंद्राः द टायगर’, ‘मेरी जंगः वन मॅन आर्मी’ अशा कितीतरी सिनेमांच्या बाबतीत होते. दक्षिणेत बहुतेक वेळा हिरोची स्टार पॉवर महत्त्वाची ठरते, पण नागार्जुन, चिरंजीवी या लोकांची उत्तर भारतातही तेवढीच मोहिनी आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे मूळ राज्यापेक्षा हिंदीमध्ये सिनेमा कल्ट होण्याची कारणं वेगळी असू शकतात. म्हणजे डबिंगमध्ये भाषेसोबत सिनेमाच्या आकर्षणाचं केंद्रही बदललं, पण सीमा ओलांडण्यासाठी सिनेमाकडे आणखी एक मार्ग असतो. काही कथांचा प्रवास फक्त भाषिक न राहता, त्यातून एक नवी कलाकृतीच तयार होते. ही नवी कलाकृती इतर भाषेतील प्रेक्षकांना भुरळ घालते, पण डबिंगसारखीच आकर्षणाचं केंद्र बदलण्याची प्रक्रिया रिमेकबाबतही पाहायला मिळते.

1993 मध्ये मल्याळम भाषेत ‘मणीचित्रताझू’ नावाचा सिनेमा आला. या सिनेमात मानसिक आजार आणि भयकथेचं अजब मिश्रण होतं. सिनेमातील मानसिक आजाराचं प्रभावी चित्रण, गूढ वातावरण व शोभनाने साकारलेल्या गंगा आणि नागवल्ली या भूमिका या कारणांमुळे सिनेमाला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला. पुढे 2005 मध्ये या सिनेमाचा ‘चंद्रमुखी’ या नावाने तामीळ भाषेत रिमेक झाला. मूळ सिनेमात जवळपास एक तासानंतर मोहनलालने साकारलेला डॉक्टर येतो, पण ‘चंद्रमुखी’मध्ये मात्र कथा सुरूच रजनीकांतपासून होते. पुढे दोनच वर्षांनी अक्षय कुमारचा ‘भूल भुलैया’ आला. त्यातली विद्या बालनची मंजुलिका आणि ‘आमी जे तोमार’ या गाण्याचा गाजावाजा झाला, पण राजपाल यादव, परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्या कॉमेडी टायमिंगमुळे या सिनेमातील विनोदच सिनेमाची खरी ओळख बनून राहिला. कथा तीच असली तरी प्रत्येक भाषेतील प्रेक्षकाने वेगवेगळ्या घटकाला जवळ केलं. यावरून कल्ट होण्याची कारणं किंवा केंद्रबिंदू कसे बदलत जातात हे लक्षात येते. एखाद्या चित्रपटाचा कल्ट दर्जा हा त्यातल्या सर्वच घटकांना समान चिकटलेला नसतो. ज्या घटकाभोवती एखाद्या प्रेक्षक समूहाची त्या चित्रपटाशी असलेली विशेष नाळ तयार होते, त्याला ण्ल्त्t aहम्प्द म्हणता येईल. तो अभिनेता असू शकतो, पात्र असू शकतं, आवाज, संवाद, दृश्य, गाणं किंवा अगदी एखादी वस्तूही.

दुसऱया भाषेत जाताना नव्या प्रेक्षकाला त्याच कथेत वेगळी गोष्ट जवळची वाटू शकते आणि तीच त्या चित्रपटाच्या नव्या सांस्कृतिक आयुष्याचं केंद्र बनू शकते. डबिंगमध्ये हा अँकर एखाद्या डबिंग आर्टिस्टच्या आवाजात किंवा दुसऱया भाषेतल्या गमतीदार संवादांमध्ये सापडू शकतो, तर रिमेकमध्ये मूळ कथानकाचा केंद्रबिंदूच बदलू शकतो. म्हणजे चित्रपट किंवा कथा सीमा ओलांडते तेव्हा तिचा कल्टही जसाच्या तसा पुढे जात नाही. भारतासारख्या बहुभाषिक देशात ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. एका भाषेत बनलेला सिनेमा दुसऱया भाषेतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचताना त्याचे सांस्कृतिक संदर्भ बदलतात आणि त्याचबरोबर त्याच्याकडे पाहण्याची दृष्टीही बदलू शकते. म्हणूनच नागार्जुन मूळ भाषेतील भूमिकेपेक्षा त्याच्या सिनेमाच्या हिंदी डबिंगमुळे एखाद्या प्रेक्षकाला लक्षात राहू शकतो.  डबिंगमधून चित्रपट सीमा ओलांडतो आणि रिमेकमधून कथा प्रवास करते. पण कल्ट?

कल्ट स्थलांतरित होतो, जातो तिथे नव्याने जन्म घेतो. प्रेक्षकांच्या निवडींवरून त्याच्या प्रवासाची दिशा ठरत असते आणि म्हणूनच कल्टची प्रतिकृती करता येत नाही. एका प्रदेशात ज्या गोष्टीभोवती एखादा चित्रपट कल्ट बनला, तीच गोष्ट दुसऱया प्रदेशात तितकी महत्त्वाची ठरेलच असं नाही. कदाचित म्हणूनच त्या दिवशी मित्राने “तेरी जबान बहुत चलती है, सूर्या” म्हटल्यावर आम्हाला तो संवाद तेलुगू चित्रपटातून आला आहे, याचा विचार करावासा वाटला नाही. कारण डॉन नं. 1 मधला सूर्या आमच्यासाठी आंध्र प्रदेशातला डॉन उरला नव्हता. तो आमच्या आठवणीतला सूर्याभाई झाला होता.

(लेखक सिनेसमीक्षक आहेत.)