निमित्त – ती आई होती म्हणुनी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शुभांगी बागडे

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये राहणाऱ्या या 47 वर्षांच्या आईला 29 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी धावणारी ही आई आहे रमाबाई रणवीर.

अनवाणी पायाने धावत, व्यावसायिक तयारीने आलेल्या धावपटूंना हरवत आपल्यातील आईच्या, पालकत्वाच्या कर्तव्याला उभारी देणाऱ्या रमाबाई रणवीर यांचे चहूबाजूंनी कौतुक होत आहे. हे कौतुक आणि त्यांच्याप्रती दाटून आलेले आश्चर्य त्यांच्यातील ‘आईपणा’ची साक्ष देणारे… रमाबाईंचे हे कौतुक होण्याचे कारण म्हणजे केवळ एका मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी प्राप्त केलेले यश नव्हे, तर मुलींच्या भविष्यासाठी त्यांनी घेतलेली ही ‘दौड’च आहे.

भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंबेजोगाई येथील खोलेश्वर संकुलाचा अमृत महोत्सव पार पडला. त्यानिमित्त ‘अमृत दौड मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या खुल्या धावण्याच्या स्पर्धेत शेकडो धावपटू सहभागी होऊन धावत होते. याच गर्दीत रमाबाई रणवीर सहभागी झाल्या होत्या. मुलीला पुस्तकं घेण्यासाठी पैसे कमी पडू नयेत म्हणून पहिलंच यायचं हे त्यांनी ठरवलं आणि करूनही दाखवलं. रमाबाईंकडे कोणताही धावण्याचा सराव नव्हता. ना मॅरेथॉनसाठी लागणारे स्पोर्टस् शूज होते ना ट्रक सूट. घरकाम करणाऱ्या रमाबाई अगदी रोजच्या साडीतच स्पर्धेत सहभागी झाल्या. पायात साधीशी जुनी झालेली स्लीपर, जी धावताना सतत पायातून निसटत होती. शेवटी रमाबाईंनी ती हातातच घेतली आणि आपले धावणे सुरू ठेवले.

रमाबाईंसाठी कदाचित शर्यत सोपी असावी, कारण याहीपेक्षा अवघड अडथळे पार करण्यात त्यांचे जीवन व्यस्त आहे. 2012 मध्ये पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याचं ध्येय त्यांच्यासमोर आहे. त्यांचं शिक्षण सातवीपर्यंतचे. त्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी घरकामाशिवाय पर्याय उरला नाही. शिक्षणाविना आपल्याला ज्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ते आपल्या मुलींच्या नशिबी येऊ नये यासाठी कष्टाची तयारी त्यांनी ठेवली. आपल्या मुलींनी खूप शिकावे हा त्यांचा अट्टहास आहे. त्या सांगतात, ‘मुलींच्या शिक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार.’ यातच त्यांच्या मॅरेथॉनमधील जिद्दीचं गमक उलगडते.

रमाबाई यांच्या दोन्ही मुली उच्च शिक्षण घेत आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी रमाबाई मूळ गाव हिंगोली सोडून अंबेजोगाईत स्थायिक झाल्या आहेत. लोकांकडे स्वयंपाकाचे काम करून त्या कुटुंब चालवितात. त्यांची एक मुलगी बीएससीचे शिक्षण घेत आहे, तर दुसरी मुलगी पोलीस भरतीसाठी तयारी करीत आहे. या मुलीला पुस्तकांसाठी पैसे हवे होते. मात्र अडचणींमुळे त्या देऊ शकल्या नाहीत. मुलीने आपण मॅरेथॉनमध्ये धावायला जाणार असल्याचे रमाबाईंना सांगितले. यात बक्षीस मिळणार, हे ऐकून त्याही मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या.

स्पर्धेच्या सुरुवातीला सर्वांत मागच्या रांगेत उभ्या असलेल्या रमाबाई तीन किलोमीटरच्या शर्यतीत अनवाणी धावत राहिल्या. शर्यत संपली तेव्हा पहिला क्रमांक त्यांचाच होता. बक्षीस मिळाले तीन हजार रुपये.

रमाबाई सांगतात की, अचानक आलेल्या जबाबदारीनंतर सुरूवातीला हाताला जे काम मिळाले ते केले. लोकांच्या शेतात काम केले. हळद वेचली, सोयाबीन, कापूस वेचला. कष्टाला नाही म्हणायचे नाही हे ठरवलेच होते. आता अंबेजोगाईत त्या ज्ञानदीप अकॅडमीत स्वयंपाकाचं काम करतात. तिथल्या विद्यार्थ्यांसाठी त्या जेवण बनवतात. याच अकॅडमीत त्यांची मोठी मुलगी पोलीस भरतीची तयारी करत आहे. तिची पुस्तक खरेदी राहिली होती.

रमाबाई धावल्या आणि जिंकल्या. त्यांना विचारले गेले की, ‘या पैशांचं काय केलं?’ रमाबाईंचे उत्तर होते, ‘तीन हजार रुपये मुलीला पुस्तकांसाठी दिले.’ रमाबाईंचे हे उत्तर मुलींसाठी राबणाऱया, धावणाऱया समस्त मातांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणारे आहे.

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये राहणाऱ्या या 47 वर्षांच्या आईला 29 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आणि ‘आई’पणाचे अस्तित्व अधोरेखित झाले.
[email protected]