
पुण्यात दहीहंडीच्या उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढताना झालेल्या दुर्घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सलमा पठाण (वय – 45) असे महिलेचे नाव आहे. जुन्या सांगवी परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ‘एएनआय‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
जुन्या सांगवी परिसरातील विघ्नहर्ता दहीहंडी मंडळातर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उशिरा दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते उभारलेला स्टेज आणि स्वागत कमान उतरवण्याचे काम करत होते. सलमा पठाण आणि त्यांचे पती सलाम पठाण हे दोघेही दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते.
कार्यक्रम संपल्यानंतर सलाम पठाण यांनी पत्नीला घरी जाण्यासाठी बोलावले. सलमा या पतीच्या दिशेने चालत येत असतानाच, कमानीचे काम सुरू असताना अचानक एक अवजड लोखंडी रॉड निसटून थेट सलमा यांच्या अंगावर कोसळला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. उपस्थितांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुण्यात दहीहंडीचा लोखंडी सांगाडा कोसळून महिलेचा मृत्यू; जुन्या सांगवीतील घटनेने खळबळ, मृत महिलेचा कार्यकर्ता मंडळाचा कार्यकर्ता pic.twitter.com/FdwkRbwAuS
— Saamana Online (@SaamanaOnline) September 5, 2026
कुटुंबाचा तक्रार देण्यास नकार; पोलिसांचे स्पष्टीकरण
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबाने कोणतीही तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे. मृत सलमा पठाण यांचा मुलगा रहीम पठाण हा याच विघ्नहर्ता मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. परिसरातील सर्व तरुण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. त्यामुळे आपल्या मुलाच्या मित्रांना किंवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर अडचणीत आणायचे नाही, असे सांगत पती सलाम पठाण यांनी तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला आहे, असे या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.
डीजे किंवा साऊंड सिस्टिमचा संबंध नाही
दरम्यान, हा अपघात लोखंडी सांगाडा उतरवताना रॉड पडल्यामुळेच घडला असून, यात ध्वनिवर्धक किंवा साऊंड सिस्टिमचा कोणताही संबंध नव्हता, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कुटुंबीयांच्या विनंतीवरून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




























































