
देशाच्या कानाकोपऱ्यात दहीहंडी उत्साव उत्साहात साजरा होत आहे. त्यातच मुंबईत उत्सवादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईत मालाडच्या मालवणी रोडवरील एकता वेल्फेअर सोसायटीत ही दुर्घटना घडली आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान भिंतीचा कॉलम कोसळून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात दहीहंडी फोडताना विटांचा कॉलम कोसळून 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. चिकुवाडी, मालवणी, मार्वे रोड येथील एकता वेल्फेअर सोसायटीतील रूम क्रमांक 23 जवळ दहीहंडीचा उत्सव सुरू होता.
दहीहंडीची दोरी एका झाडाला तसेच तळमजल्यावरील बांधकामाच्या विटांच्या कॉलमला बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नादरम्यान अचानक विटांचा कॉलम कोसळला आणि त्याखाली 7 वर्षीय रुद्र कदम हा मुलगा अडकला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर रुद्रला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील माहितीनुसार डॉक्टरांनी रुद्रला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वॉर्ड कंट्रोल रूम, पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.




























































