लंडन विमानतळावर सायबर हल्ला! शिंदेंची टीम झ्युरिकमध्ये अडकली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर झालेल्या कथित सायबर हल्ल्यामुळे बुधवारी येथील विमानसेवा कोलमडून पडली. तब्बल 1200 विमानांचे मार्ग बदलण्यात आले, तर जवळपास सर्वच विमानांना 10 ते 12 तासांचा उशीर झाला. याचा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकारी व फोटोग्राफर यांना बसला. हे सगळे लोक झ्युरिकमध्ये अडकून पडले.

एका कार्यक्रमासाठी शिंदे हे मंगळवारी रात्री मोठय़ा लवाजम्यासह लंडनला रवाना झाले. शिंदे यांच्या चमूतील अधिकारी व फोटोग्राफर वेगळय़ा विमानात होते. हे सगळे लोक लंडनमधील हिथ्रो विमानळावर उतरणार होते. मात्र तिथे सायबर हल्ला झाल्याची अफवा उडाली आणि सर्व विमानांचे मार्ग वळवण्यात आले. हिथ्रो विमानतळावर कोणतेही विमान उतरवण्यास मनाई करण्यात आली. शिंदेंचे ओएसडी आणि फोटोग्राफर्सचे विमान स्वित्झर्लंडमधील झ्युरिक विमानतळावर उतरवण्यात आले. हिथ्रो विमानतळावरील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत शिंदेंची टीम झ्युरिकमध्येच अडकली. पहाटे पाच ते सात असे दोन तास त्यांना ताटकळत राहावे लागले.

हल्ला नव्हे, तांत्रिक गोंधळ

इंग्लंडमधील 15 विमानतळांवरील वाहतूक सेवेचे नियंत्रण करणाऱ्या ‘नॅट्स’ने (नॅशनल एअर ट्रफिक सर्व्हिस) यासंदर्भात खुलासा केला आहे. इंग्लंडमधील विमानतळावर कुठल्याही प्रकारचे सायबर हल्ले झालेले नाहीत. हा सिस्टममध्ये उद्भवलेला तांत्रिक बिघाड होता. त्याचा फटका विमानसेवेला बसला, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सरकारने दिले चौकशीचे आदेश

विमानतळावरील गोंधळामुळे नॅट्सच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कंपनीच्या प्रमुखांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या खासदारांनी केली आहे. तर परिवहन मंत्र्यांनी प्रवाशांची माफी मागत या गोंधळाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.