
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या निकालातील गुणांमध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत दिसून आली आहे. यामुळे एमपीएससीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत परीक्षार्थी उमेदवारांनी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. याची गंभीर दखल घेत एमपीएससी प्रशासनाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या गुणांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चा लेखी परीक्षेचा निकाल 25 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. यामध्ये काही परीक्षार्थी उमेदवारांना एका पेपरमध्ये अपेक्षेपेक्षा मोठय़ा प्रमाणात गुण मिळाले, तर दुसऱ्या पेपरमध्ये फारच कमी गुण मिळाले. यामुळे अनेक उमेदवारांनी निकाल पद्धतीवर थेट आक्षेप नोंदवला आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन नेमके कोणत्या पद्धतीने करण्यात आले याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मूल्यांकनातील अनियमिततेची चौकशी करावी, उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करावी आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, या मागण्यांसाठी परीक्षार्थी उमेदवारांबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेत रस्त्यावर उतरून एमपीएससी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालाची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुलाखतीसाठी अपात्र उमेदवारांनाच पडताळणीची संधी
मुलाखतीसाठी अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणांची फेरपडताळणी करावयाची असल्यास 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या पेपरमधील गुणांची फेरपडताळणी करून त्याबाबतची वस्तुस्थिती त्यांच्या प्रोफाइलवर कळविण्यात येणार आहे.
संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करा
केवळ गुणांची फेरपडताळणी न करता संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालाबाबतही संशय निर्माण झाल्याने आयोगाच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांचा रोष वाढला आहे.
कटऑफबाबतही उमेदवारांमध्ये संभ्रम
यूपीएससी आणि एमपीएससी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम एकच (1750 गुण) असताना, दोन्ही संस्थांच्या मुख्य परीक्षेच्या ‘कटऑफ’ मध्ये तफावत आहे. यूपीएससी कटऑफ जनरल ः 739 गुण, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा कटऑफ जनरल ः 942 गुण, अराखीव महिला ः 959 गुण असा आहे. एकाच अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेत एमपीएससीचा कटऑफ यूपीएससीपेक्षा तब्बल 203 गुणांनी, तर ‘महिला’ कटऑफ 220 गुणांनी जास्त कसा जाऊ शकतो? असा संभ्रम आहे.
नेमका वाद काय आहे?
अनेक विद्यार्थ्यांना इतर सर्व विषयांमध्ये उत्तम गुण असताना वैकल्पिक (ऑप्शनल) विषयांमध्ये 2, 4 किंवा 6 असे अत्यंत कमी गुण मिळाल्याचे समोर आले आहे. एका उमेदवाराला दोन्ही भाषा विषय, निबंध, सामान्य अध्ययनाचे चारही पेपर आणि वैकल्पिक विषय-1 मध्ये सरासरी 100 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, परंतु त्याच उमेदवाराला वैकल्पिक विषय-2 मध्ये अवघे 2 गुण देण्यात आले आहेत. मराठी भाषेत 202 गुण, इंग्रजीत 135, निबंधात 90, तसेच जीएस-1 (88), जीएस-2 (88), जीएस-3 (83) आणि जीएस-4 (90) असे उत्तम गुण मिळाले आहेत. मात्र, वैकल्पिक विषय-1 मध्ये फक्त 6 गुण आणि वैकल्पिक विषय-2 मध्ये 58 गुण दिले गेले आहेत.
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. प्रथमेश दिलीप देशमुख (25) असे या तरुणाचे नाव असून तो शनिवार पेठेतील नंदन सोसायटीत वास्तव्याला होता. तो मूळचा धाराशीवमधील आहे.



























































