बेकायदा बाईक टॅक्सींवर कारवाई होणार; रिक्षाचालकांना दिलासा, शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर परिवहन मंत्र्यांचे सक्त निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकसह संपूर्ण राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या व्यवसायावर परिणाम करणाऱ्या नियमबाह्य बाईक टॅक्सीविरोधात तातडीने कारवाई करण्याचे सक्त निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी दिले. ओला, उबेर आणि रॅपिडो अॅपच्या माध्यमातून सुरू असलेल्या बाईक टॅक्सीविरोधात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका मांडली होती. त्यांच्या पत्राची गंभीर दखल घेत परिवहनमंत्र्यांनी विशेष बैठक बोलावली आणि नियमबाह्य बाईक टॅक्सीविरोधात सक्त कारवाईचे निर्देश दिले. त्यामुळे उर्वरित राज्यासह नाशिक येथील रिक्षा व्यावसायिकांचा गंभीर प्रश्न सुटणार आहे.

बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे हजारो मराठी रिक्षाचालकांचा रोजगार संकटात सापडला. या गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधत संजय राऊत यांनी 23 ऑगस्टला परिवहनमंत्री सरनाईक यांना पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राला अनुसरून सरनाईक यांनी रिक्षाचालकांच्या समस्यांबाबत बुधवारी मंत्रालयात बैठक

बोलावली. यावेळी नाशिक येथील नवसंघर्ष संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष समाधान अहिरे, कार्याध्यक्ष नितीन मुर्तडक, प्रदेश अध्यक्ष बिलाल खोत आणि प्रदेश उपाध्यक्ष गणेश नीळपंठ यांच्या शिष्टमंडळासोबत परिवहनमंत्र्यांनी बाईक टॅक्सीच्या परवानगीबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, सहआयुक्त रवी गायकवाड, विधी विभागाचे सचिव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी परिवहनमंत्र्यांनी नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात तातडीने कारवाई करण्याचे सक्त निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकना मुभा नाहीच!

पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकचा प्रवासी वाहतुकीसाठी व्यावसायिक वापर करण्यास मुभा नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्याला अनुसरूनच नाशिक शहरात सुरू असलेल्या बाईक टॅक्सीविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहनमंत्र्यांनी नाशिकचे मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांना दिले.

डोमिसाईल, पोलीस पडताळणी बंधनकारक

बाईक टॅक्सीसाठी वाहन व चालकाला कायदेशीर अटींची पूर्तता तसेच रितसर सर्व परवानग्या मिळवणे बंधनकारक असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यात परवाना आणि बॅजसह डोमिसाईल, पोलीस व्हेरिफिकेशनचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

रॅपिडोशी संबंधित प्रकरणात एफआयआर

रॅपिडो कंपनीशी संबंधित प्रकरणात नाशिक येथे एफआयआर दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणात नाशिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.