
पालिकेत सत्तास्थापनेनंतर गेल्या सहा महिन्यांपासून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण सुरूच असून आज सत्ताधाऱ्यांच्याच सभात्यागामुळे पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. सुधार समितीत भूखंडाच्या आरक्षण बदलावरून भाजपने शिंदे गट मनमानी करीत असल्याचा आरोप करीत ऑकआऊट केले तर स्थायी समितीत शिंदे गटाने भाजप भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना अभय देत असल्याचे सांगत ऑकआऊट केले.
सुधार समितीत आज जोगेश्वरी पूर्व येथील ‘म्हाडा’च्या एका भूखंडावरील ‘आरआर 2.1 पुनर्वसन’ हे आरक्षण हटवून तब्बल 1802.75 चौरस मीटर जमीन निवासी वापरासाठी (बिल्डरांच्या फायद्यासाठी) मोकळी करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला. मोकळ्या जागा वाचवण्याचा देखावा करीत भाजप नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. मात्र भाजपचा विरोध डावलून सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी हा प्रस्ताव बहुमत असल्याचे जाहीर करीत थेट मंजूर करून भाजपला मोठा झटका दिला. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत थेट वॉकआऊट केले.
सत्ताधाऱ्यांच्या या भूखंड गिळंकृत करण्याच्या धोरणावर आणि वॉकआऊटच्या नाटकाचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला. ही सुधार समिती राहिलेली नसून ‘आरक्षण बदल समिती’ झाली आहे. मुंबईकरांच्या मोकळ्या जागा आणि मैदानांची आरक्षणे सुरक्षित राहावीत म्हणून आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. मात्र सत्ताधारी मुंबईतील जमिनी विकायलाच निघाले आहेत. आजदेखील वॉकआऊट करताना प्रस्ताव पास केला आणि त्यानंतर त्यांनी वॉकआऊट केले. मुंबईकरांना दाखवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाची ही नाटपं सुरू आहेत अशी टीका शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली. मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेक करण्यासाठीच भाजपचे हे नाटक सुरू आहे. मुख्य सभागृहात हा विषय येईल तेव्हाही भाजपने असाच वॉकआऊट करून दाखवावा, असे आव्हान काँग्रेस गटनेते अशरफ आजमी यांनी दिली.
माझे प्रस्ताव मंजूर केले तरच तुमचे मार्गी लावणार – संध्या दोशी
याआधीच्या बैठकीतही एका भूखंडाच्या प्रस्तावावरून अध्यक्षा संध्या दोशी आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. ‘आमचे प्रस्ताव मंजूर केले तरच तुमचे प्रस्ताव मार्गी लावू देणार’, असा थेट इशाराच त्यावेळी अध्यक्षांनी भाजपला दिला होता. सत्ताधाऱ्यांच्या कुरघोडीचा आज पुन्हा प्रत्यय आला.
…तर सत्तेवर लाथ मारू!
सरकारच्या ‘अभय योजने’त पालिका अधिकारी उघडपणे कोटय़वधींचा भ्रष्टाचार करीत असताना भाजप अशा अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घातल असल्याचा गंभीर आरोप करत शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. ‘भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही स्थायी समितीत पाऊल ठेवणार नाही; गरज पडल्यास सत्तेवरही लाथ मारू’, असा इशारा त्यांनी दिला.



























































