
रोजगार असोत, गिफ्ट सिटी असो किंवा स्मार्ट सिटी. केंद्रातील भाजप सरकार सर्वकाही गुजरातकडे खेचून नेत आहे. आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळाही दिल्लीऐवजी गुजरातच्या केवडिया येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. केंद्र सरकार गुजरातचे आहे की संपूर्ण देशाचे? असा सवाल करतानाच, आता फक्त राष्ट्रपती भवन गुजरातला नेणे बाकी आहे असा उपरोधिक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रातील भाजप सरकार, राज्यातील महायुती सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचा विविध मुद्दय़ांवरून समाचार घेतला.
पालिकेत 100 कोटींचा आयटी घोटाळा
मुंबई पालिकेच्या आयटी विभागातील निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करून 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. 2022 मध्ये आलेल्या दोन निविदांमध्ये अँटीव्हायरसची किंमत सुमारे 1200 रुपयांवरून 6500 रुपयांपर्यंत नेण्यात आली आणि या विभागात आतापर्यंत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाल्याचा आरोप त्यांनी केला.
एमपीएससीच्या प्रश्नावर सरकारला घेरले
एमपीएससीच्या पेपरफुटीविरोधात पुणे, कोल्हापूरसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असूनही सरकार त्यांची दखल घेत नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न राज्याच्या भवितव्याशी निगडित असूनही सरकारकडून अपेक्षित पावले उचलली जात नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
हा सोहळा गुजरातला का, मुंबईत का नाही?
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीतून गुजरातमध्ये हलवण्याचे कारण काय आणि या सोहळ्याचे स्थळ हलवायचेच होते तर ज्या दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला त्या महाराष्ट्रात, मुंबईत का नाही? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचे, मुंबई शहराचे महत्त्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचे जे महत्त्व आहे ते हळूहळू संपवण्याचा हा प्रयत्न आहे. कधी ना कधी ‘आता उरलो गुजरातपुरते’ अशी आपली गत होणार याची खात्रीच वाटत असल्यामुळे किमान तिकडे तरी महात्म्य निर्माण करून घेऊ, हा अट्टहास यामागे केंद्रातील दोन सत्ताधीशांचा दिसतोय, असे राज ठाकरे यांनी नमूद केले.






























































