
पावसाने मारलेल्या दांडीमुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या अभूतपूर्व संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि बाधित शेतकऱयांना भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पावसाच्या तुटवडय़ामुळे झालेल्या पीक नुकसानीचे प्रशासनामार्फत तत्काळ व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. प्रभावित भागात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱयांना हेक्टरी भरघोष सानुग्रह अनुदान देण्यात यावे. संत्रा व मोसंबीच्या मोठय़ा प्रमाणावर झालेल्या फळगळीपोटी फळबागधारकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. धान पिकावरील ‘खोडकिडा’ व इतर रोगांच्या नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत मोफत मार्गदर्शन आणि औषध फवारणीसाठी आर्थिक मदत पुरवण्यात यावी, अशा मागण्या अनिल देशमुख यांनी निवेदनातून केल्या आहेत.
पावसाच्या तुटवडय़ामुळे नागपूर व अमरावती जिह्यातील संत्रा आणि मोसंबीच्या बागांना प्रचंड फटका बसला असून मोठय़ा प्रमाणावर फळगळ होत आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके शेतातच वाळू लागली आहेत. सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या संवेदनशील टप्प्यावर असताना पाऊस गायब झाल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, धान उत्पादक पट्टय़ात धानाचे पेरे करपून गेले असून उर्वरित पिकावर ‘खोडकिडा’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक हातातून जाण्याच्या मार्गावर असल्याकडे अनिल देशमुख यांनी यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.



























































