
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभेच्या वतीने गुरुवारी 30 एसटी बस लालबाग येथून कोकणात सोडण्यात आल्या. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी गाड्यांना भगवा झेंडा दाखवला. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात बस कोकणाकडे रवाना झाल्या.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो मुंबईकर कोकणातील गावी जातात. मात्र गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे आणि बसचे आरक्षण मिळणे कठीण असल्याने गणेशभक्तांसमोर गावी जाण्याचा प्रश्न निर्माण होतो. हीच अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभेच्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून ‘आपली बस सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही लालबागच्या भारतमाता सिनेमागृहापासून 30 एसटी बस कोकणाच्या दिशेने रवाना झाल्या. त्यातून हजारो चाकरमानी गावी रवाना झाले. कोकणातील खेड, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी, वैभववाडी, गुहागर, मालवण, देवगड आदी गावांपर्यंत या बस धावणार आहेत.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव सुधीर साळवी, सूरज चव्हाण, नगरसेवक किरण तावडे, सचिन पडवळ, भारती पेडणेकर, सुप्रिया दळवी, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, मनसे विभाग अध्यक्ष राजेश मोरे, चेतन पेडणेकर, विभाग अध्यक्षा नम्रता पवार, विधानसभा प्रमुख लता रहाटे, कुलाबा विधानसभा विभाग अध्यक्ष वैभव शिंदे, उपविभाग संघटक श्वेता राणे, शाखा संघटक कविता माने, कांचन घाणेकर, शुभदा पाटील आदी उपस्थित होते.



























































