टीडीसीसी बँकेच्या वार्षिक सभेत मानापमानाचा हिशेब गाजला, वार्षिक अहवालात छोटा फोटो छापल्याने कपिल पाटील समर्थकांचा ड्रामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सभा फोटोच्या मानापमानाच्या नाट्यामळे आज चांगलीच गाजली. वार्षिक अहवालात अनेक नेत्यांची छायाचित्रे पानभर झळकली. मात्र माजी केंद्रीय राज्यमंत्री व बँकेचे विद्यमान संचालक कपिल पाटील यांचा फोटो संचालकांच्या पंक्तीत छोट्या आकारात प्रसिद्ध झाल्याने त्यांच्या समर्थकांनी आक्षेप घेत अध्यक्षांना जाब विचारला. या सभेत झालेल्या हाय-व्होल्टेज ड्रामाने काही काळ वातावरण चांगलेच तापले.

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडली. या सभेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानापमानाचे नाट्य आणि राजकीय हिशेब चांगलेच गाजल्याचे पाहायला मिळाले. प्रथमच भाजपच्या ताब्यात आलेल्या बँकेच्या नव्या संचालक मंडळाच्या पहिल्याच सभेत मोठा फोटो कोणाचा? या मुद्यावरून राजकीय घमासान झाले.

वार्षिक अहवालात अनेक नेत्यांची छायाचित्रे पानभर झळकली. मात्र माजी केंद्रीय राज्यमंत्री बँकेचे विद्यमान संचालक कपिल पाटील यांचा फोटो संचालकांच्या पंक्तीत छोट्या आकारात प्रसिद्ध झाल्याने वाद वाढला. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा तर फोटोच नसल्याने ‘बँकेला विसर पडला की छपाईवाल्याला? अशी चर्चा रंगली. त्यातच खासदार सरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी व्यासपीठावर अनेक जण प्रोटोकॉलनुसार न बसल्याने सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला.

ठेवींमध्ये १५ टक्क्यांनी वाढ

बँकेच्या ठेवींमध्ये तब्बल १५.९९ टक्क्यांनी वाढ होऊन त्या ११ हजार १७१ कोटी ९२ लाखांवर पोहोचल्या आहेत. गतवर्षी बँकेला १८१ कोटी रुपयांचा ढोबळ नफा तर ५७ कोटी २५ लाखांचा निव्वळ नफा झाला. निव्वळ नफ्यातून १५ टक्के लाभांश आणि कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याची घोषणा अध्यक्ष अरुण पाटील यांनी केली.