पेणमध्ये ऑनलाइन खत विक्रीचे सर्व्हर डाऊन, बळीराजा हवालदिल; दुकानांसमारे जत्रेसारखी गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांना त्याच्या मागणीनुसार वेळेत रासायनिक खेते मिळावीत यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन खत विक्रीचा पेणमध्ये फज्जा उडाला आहे. ऑनलाइन खत विक्रीचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना खतांची खरेदी करता आली नाही. खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीसेवा केंद्रांसमोर जत्रेप्रमाणे गर्दी केली. खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

खत विक्रीमध्ये पारदर्शकता यावी आणि सध्याच्या ऑनलाइनच्या स्मार्ट युगात शेतकरीदेखील स्मार्ट व्हावा या उद्देशाने शासनाने रायगड जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन खत विक्री सुरू केली आहे. ४५ किलो वजनाच्या खताच्या पिशवीची किंमत सुमारे १ हजार ९०० रुपये असून शेतकऱ्यांना शासनामार्फत ३०० रुपयांना देण्यात येते. खताच्या प्रत्येक पिशवीमागे शासनाकडून १ हजार ६०० रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. सध्या मात्र प्रत्येक शेतकऱ्याला युरिया खताची एकच गोणी दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत हे खत फार कमी आहे. ऑनलाइन सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हे अपुरे खतही शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

ऑफलाइन खत विक्री सुरू करा

पेण तालुक्यात जवळपास २५ लायसनधारक खत विक्रेते आहेत. वारंवार सर्व्हर डाऊन होणे, ओटीपी न येणे, यामुळे खत विक्रेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काही दुकानांमध्ये भांडणेही होत आहेत. या जाचाला कंटाळून अनेक खत विक्री केंद्रांनी खतेच विक्रीसाठी ठेवली नाहीत. त्यामुळे खताची ऑफलाइन विक्री सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पेण तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी केली आहे.

  • शेतकऱ्यांना गरज असताना जी खत विक्री केंद्रे खत विक्री करत नाहीत अशा केंद्रांचे लायसन बाद करावे, अशी सूचनाही तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी प्रशासनाला केली आहे.
  • शेतकऱ्याला ऑनलाइन पद्धतीने मिळणाऱ्या खताची प्रक्रिया ही थेट दिल्लीहून चालत असेल तर त्या खत विक्रीचा सर्व्हर डाऊन होणारच आहे. सर्वप्रथम कृषी विभागाने स्वतःहून आधी स्मार्ट व्हावे आणि नंतर ऑनलाइन खत विक्री सुरू करावी, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
  • उशिरा आलेल्या पावसामुळे यंदा भात लागवड उशिरा झाली. आता पुन्हा पावसाने दडी मारली आहे. त्यातच पिकाला योग्य वेळेत खतच मिळाले नाही तर सर्व कष्ट पाण्यात जाणार आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.