
पूर्व डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमधील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या बुकावू शहरात गुरुवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. एका निवासी वस्तीत लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण करत लगतच्या दोन शाळांना कचाट्यात घेतले. या भयानक आगीत आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 29 शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ‘अल जझीरा‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुकावू शहरातील चिंपुंडा परिसरात सकाळी 8 च्या सुमारास प्रथम आग लागली. वाऱ्यामुळे ही आग क्षणार्धात शेजारील उजामा प्राथमिक शाळा आणि फुराहा माध्यमिक शाळा येथे पसरली. आगीच्या तीव्रतेमुळे शाळांच्या इमारतींसह परिसरातील सुमारे 300 लाकडी घरे जळून भस्मसात झाली.

आग लागल्याचे समजताच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. जिवाच्या आकांताने बाहेर पडण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांची मोठी चेंगराचेंगरी झाली. लहान मुले एकमेकांच्या अंगावरून धावू लागली. धुरामुळे गुदमरून आणि चेंगरल्यामुळे अनेक बालके जागीच बेशुद्ध पडली व काहींचा मृत्यू झाला. मृत बालकांमध्ये 19 मुली आणि 5 मुलांचा समावेश असल्याचे ‘AFC/M23’ बंडखोर गटाचे प्रवक्ते लॉरेन्स कान्युका यांनी सांगितले.

21 विद्यार्थी अतिदक्षता विभागात
दुर्घटनेनंतर स्थानिक रुग्णालय आणि आपत्कालीन पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. धुरामुळे गुदमरलेल्या 50 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांना तातडीने जवळच्या रुग्णालयांत हलवण्यात आले. सध्या 29 जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी 21 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

शहरात आगीचे सत्र सुरूच
फेब्रुवारी 2025 पासून या शहरावर रवांडा-समर्थित बंडखोर गटाचे नियंत्रण आहे. बुकावू शहरात गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वीच लागलेल्या एका आगीत 45 हून अधिक घरे खाक झाली होती. त्यात आता पुन्हा ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.



























































