
आखातातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 108 डॉलरच्या पार गेल्या आहेत. याचे पडसात शुक्रवारी हिंदुस्थानच्या शेअर बाजारातही उमटले. महागाई, आर्थिक विकास दर आणि कंपन्यांच्या नफ्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांच्या भीतीपोटी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. याशिवाय अमेरिकेतील बाँड यील्डमध्ये झालेली वाढ आणि गुंतवणूकदारांमधील चिंतेचे वातावरण यामुळे बाजारावर दबाव वाढला.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 708.23 अकांनी (0.95 टक्के) घसरून 74,194.36 वर आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी-50 मध्येही 259.70 अंकांची घसरण झाली आणि तो 23,218.10 वर पोहोचला. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये गुंतवणूकदारांचे जवळपास 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
कच्चे तेल पेटले
इराण आणि अमेरिकेतील संघर्षामुळे आखातात पुन्हा एकदा परिस्थिती बिघडू लागली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांवरील हल्ले चिंतेचा विषय ठरत असून यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती 108.62 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. अर्थात याचा फायदा तेल कंपन्यांना झाला असून ओएनजीसीचा शेअर 1.85 टक्क्यांनी वधारून 241.67 वर पोहोचला.
आयटी शेअर्समध्ये तेजी
चौफेर घसरण होत असताना आयटी शेअर्सनी बाजाराला सावरण्याचा प्रयत्न केला. निफ्टी आयटी निर्देशांक 0.38 टक्क्यांनी वाढला. टेक महिंद्राचा शेअर 1.84 टक्के, एचसीएल टेकचा शेअर 1.23 टक्के, इन्फोसिसचा शेअर 1.03 टक्के वाढला. यासह भारती एअरटेल 0.56 टकत्के, आयटीसी 0.39 टक्के, अदानी पोर्टस 0.07 टक्के वाढला.
हुथी बंडखोरांचा हैदोस
येमेनमधील इराण समर्थित हौथी बंडखोरांनी गुरुवारी मोचा हे महत्त्वाचे बंदर शहर ताब्यात घेतले आणि लाल समुद्राच्या किनारपट्टीवर मोक्याच्या बेटांकडे वाटचाल सुरू केली. तसेच लाल समुद्र आणि होर्मुझची सामुद्रधुनी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गांवर टँकरवरील हल्ले वाढल्याने पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.


























































