
>> अभय मिरजकर
यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात जन्मलेल्या ‘अव्हेंजर’ वाघाने तब्बल 500 किलोमीटरहून अधिक अंतर पार करत पाच जिह्यांत भ्रमंती केली असून नुकताच धाराशिव जिल्ह्यातील येसंवंडी परिसरात त्याचा पुन्हा माग लागला आहे.
‘रानाची वाट धरली की, वाट कुठे नेईल सांगता येत नाही, पण वन्यजीवांचा प्रवास निसर्गाच्या गूढविश्वाची नवी पाने उलगडत जातो.’ मराठवाडय़ाच्या भूमीत सध्या एका पाहुण्याची चर्चा रंगली आहे. हा पाहुणा कुणी माणूस नाही, तर जंगलाचा राजा वाघ आहे. लातूर, धाराशीव, बीड, अहिल्यानगर परिसरात स्थिरावलेल्या या वाघाच्या प्रवासाची कहाणी जितकी थक्क करणारी आहे, तितकीच ती निसर्गाच्या अद्भुत चक्राची साक्ष देणारी आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार हा वाघ टी-22 असून तो नर आहे. त्याचे नाव ‘अॅव्हेंजर’ असे आहे. 2022 मध्ये टिपेश्वर परिसरात त्याचा जन्म झाला. ‘फोरमार्क’ नावाच्या वाघिणीचा हा बछडा आहे. जन्मानंतर काही काळ त्याचा ठावठिकाणा लागलाच नव्हता. मात्र काळाच्या ओघात त्याने जंगलाच्या वाटा तुडवत आपला स्वतंत्र प्रवास सुरू केला. टिपेश्वरमधून निघालेला हा राजा आपल्या स्वतचा अनिर्बंध प्रदेश ठरवत पुढे पुढे सरकत होता. यवतमाळच्या जंगलातून सुरू झालेली त्याची भटकंती पुढे आदिलाबाद, नांदेड, किनवट, लातूर अशा प्रदेशांतून होत धाराशिवच्या दिशेने सरकली. त्यानंतर त्याचा वावर बीड आणि अहिल्यानगर जिह्याच्या परिसरापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. एका वाघाचा हा प्रवास म्हणजे केवळ एका प्राण्याची भटकंती नाही, तर जंगल, पाणी, अन्न आणि सुरक्षित अधिवासाच्या शोधात निसर्गाने आखून दिलेली एक अनोखी वाटचाल आहे. या पट्टेदार प्रवाशानेही जंगलाच्या सीमा ओलांडत आपल्या जगण्याची नवी वाट शोधली आहे.
कधी दाट जंगलाची सावली, कधी डोंगर-दऱया, कधी नदी-नाले आणि कधी मानवी वस्त्यांच्या जवळून जाणारा मार्ग. या सगळ्यांतून ‘अॅव्हेंजर’ने केलेला प्रवास खरोखरच अचंबित करणारा म्हणावा लागेल. धाराशिव जिल्ह्यात त्याला पकडण्यासाठी पिंजरेही लावले गेले होते, पण तो पिंजऱयात अडकला नाही. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च भक्षकांपैकी एक आहे. त्याचा अधिवास विस्तारला किंवा तो नव्या परिसरात आढळला, तर त्यामागे अनेक नैसर्गिक कारणे असू शकतात. त्यामुळे वाघाचा वावर हा केवळ भीतीचा विषय न मानता निसर्ग आणि मानव यांच्यातील सहअस्तित्वाचा प्रश्न म्हणून पाहणे आवश्यक आहे.
‘जंगल वाचले तर वन्यजीव वाचतील आणि वन्यजीव वाचले तर निसर्गाचे संतुलन टिकेल.’ मात्र वन्यजीव मानवी वस्तीजवळ आल्यास सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेषत रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी.
आपल्या परिसरात वाघ किंवा बिबटय़ाचा वावर असल्याची माहिती असल्यास रात्रीच्या वेळी एकटय़ाने शेतात जाणे टाळावे. जनावरांना शक्यतो सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी ठेवावे. शेताच्या परिसरात पुरेशी विद्युत प्रकाशव्यवस्था करावी. वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याला घेरणे, दगड मारणे किंवा इजा करण्याचा प्रयत्न करणे टाळावे. अशा कृतीमुळे प्राणी अस्वस्थ होऊन आक्रमक होण्याची शक्यता असते. वाघ दिसल्यास घाबरून आरडाओरडा करू नये आणि त्याच्या दिशेने धावू नये. सुरक्षित अंतर ठेवून शांतपणे दूर जाणे आणि तातडीने जवळच्या वन विभागाला माहिती देणे हा सर्वात योग्य मार्ग आहे. ‘सावध तो सुखी,’ ही साधी म्हण अशा प्रसंगी अत्यंत महत्त्वाची ठरते.
टिपेश्वरपासून मराठवाडय़ाच्या विविध जिह्यांपर्यंतचा ‘टी-22 अॅव्हेंजर’चा प्रवास हा निसर्गाच्या अफाट क्षमतेची जाणीव करून देणारा आहे. जंगलाच्या सीमा माणसांनी आखलेल्या असल्या तरी वन्यजीवांच्या जगात निसर्गाची स्वतचीच वाट असते.
आज ‘अॅव्हेंजर’ मराठवाडय़ातील जंगल परिसरात स्थिरावला आहे. त्याचा पुढचा प्रवास कुठे असेल, हे सांगता येत नाही. मात्र त्याच्या या प्रवासाने एक गोष्ट नक्कीच अधोरेखित केली आहे, वन्यजीवांसाठी अधिवास आणि सुरक्षित जंगल राखणे ही काळाची गरज आहे. ‘निसर्गाशी जुळवून घेतले तर सहजीवन शक्य आहे; निसर्गाशी संघर्ष केला तर त्याची किंमत माणसालाच काय पण वन्यजीवांनाही मोजावी लागते.’
आज रोजी लातूर जिल्हा तसा नगण्य वन्यक्षेत्र असलेला जिल्हा. कधीकाळी अफाट जंगल असणारा हा भूभाग. जिथे घनदाट जंगल तर होतेच, पण पाणी भरपूर होते. पाणगेंडय़ाची वसाहत असणारा हा भूप्रदेश आज पाण्यासाठी तरसत आहे. उसाचे क्षेत्र वाढल्याने वाघ, बिबटय़ांचा वावर वाढलेला आहे. अगदी स्वातंत्र्यानंतरही या भागात वाघ, बिबटय़ांचा वावर होता असे सांगितले जाते.

























































