
‘अमेरिका आणि इस्रायलचा प्रत्येक हल्ला आम्ही यशस्वीरीत्या परतावून लावला आहे. त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे. आमचा मार्ग सत्य आणि न्यायाचा आहे. त्यामुळे इराण कोणाच्याही दडपशाहीला भीक घालणार नाही. कदापि शरण जाणार नाही,’ अशा शब्दांत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी अमेरिकेला ठणकावले आहे.
आखातात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून दोन्ही बाजूंनी संयम पाळावा असे आवाहन ब्रिक्स परिषदेत करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर पेजेश्कियान यांनी ही भूमिका मांडली. ‘अमेरिका व इस्रायल नागरी सेवा, पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहेत. लोकांचा अन्नपुरवठा तोडला जात आहे, याकडे त्यांनी ब्रिक्स देशांचे लक्ष वेधले.’ तुमच्यात माणुसकी जिवंत असेल तर निरपराध नागरिकांना अन्न, पाणी व औषधे का मिळू देत नाही, असे पेजेश्कियान यांनी सुनावले. ‘धमकावून आणि घाबरवून तुम्ही इराणी जनतेला शरण यायला भाग पाडू शकत नाही. ते कदापि शक्य नाही,’ असे त्यांनी ठणकावले.
ताकदीच्या जोरावर मनमानी चालणार नाही ः झिनपिंग
ब्रिक्स परिषदेच्या दुसऱया सत्राला संबोधित करताना चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग यांनीही अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा दिला. ‘जो शक्तिशाली तोच बरोबर’ हे जगाच्या राजकारणात चालू देता कामा नये. आंतरराष्ट्रीय नियम हे सर्व देशांनी मिळूनच ठरवले पाहिजेत, असे झिनपिंग म्हणाले. अविकसित व विकसनशील देशांनी एआय, व्यापार, डिजिटल उद्योग, उत्पादन, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘तुम्ही खरोखरच लढवय्ये असाल तर इराणच्या लष्कराशी थेट सामना करून दाखवा. सर्वसामान्य जनतेला लक्ष्य करण्याची गरज काय?’


























































