
महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले आहे. मात्र त्यामध्ये गंभीर त्रुटी व विसंगती असल्याची टीका ‘म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन, मुंबई’ने केली आहे. सर्व प्रमुख अभियंते व संबंधित अभियांत्रिकी आस्थापनांशी विचारविनिमय करून सुधारित अंतिम मसुदा होईपर्यंत या परिपत्रकाच्या अंमलबजावणीस तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने केली आहे.
कॅश ऑफ ट्रान्सफर म्हणजेच पैसे दैऊन पालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या होत असल्याची टीका झाल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने अभियंत्यांना महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळावा आणि सर्वांना समान संधी मिळावी, म्हणून या उद्देशाने कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन, मुंबईने विरोध केला आहे. यासंदर्भात असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले आहे.
संगणीकृत प्रणालीमध्ये जर चुकीची, अपूर्ण किंवा कालबाह्य माहिती समाविष्ट केली तर त्या माहितीच्या आधारे होणारी बदली प्रक्रिया वस्तुनिष्ठ व न्याय्य राहणार नाही. त्यामुळे आधी माहिती आणि प्रक्रिया अचूक करा व त्यानंतरच संगणीकृत प्रणालीद्वारे बदली करा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
अत्यावश्यक कुशल व अनुभवी अभियंत्यांची कोअर लिस्ट निश्चित करावी. तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेवाकाळ पूर्ण झालेल्या अभियंत्यांची ह्यू लिस्ट प्रसिद्ध करावी. सध्याच्या निवासाचा पत्ता नोंदवण्यासाठी स्वतंत्र सुविधा द्यावी आदी मागण्या असोसिएशनने केल्या आहेत.


























































