रॅम्प सोडून थेट ऑफिस डेस्कवर! मिस युनिव्हर्स फायनलिस्ट उमंगाचा Google ऑफिसमधला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उमंगा कुमावतने मिस युनिव्हर्स इंडिया २०२६ च्या अंतिम फेरीत भाग घेतला होता. तिचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. फिनालेनंतर अवघ्या काही दिवसांतच उमंगाने पुन्हा आपल्या नेहमीच्या कामांना प्राधान्य दिले आहे. उमंगा ही बंगळुरूमधील Google च्या कार्यालयात क्लाउड इंजिनिअर म्हणून काम करते. उमंगाने मिस युनिव्हर्स इंडिया २०२६च्या स्पर्धेत मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते. ती स्पर्धेतील टॉप २० अंतिम स्पर्धकांमध्ये होती. रॅम्पवर ग्लॅमरस अंदाजात दिसणारी उमंगा आता मात्र लॅपटॉप, मीटिंग्ज आणि ऑफिसच्या कामात व्यस्त असल्याचे तिच्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

१४ सप्टेंबरला उमंगाने इन्स्टाग्रामवर जवळपास एक मिनिटाचा ‘डे इन माय लाईफ’ व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमधून तिने मिस युनिव्हर्सच्या मंचावरील झगमगाटानंतरचं तिचं रोजचं आयुष्य दाखवलं आहे. व्हिडिओची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता होते. ऑफिसला जाण्यापूर्वी तयार होताना उमंगा ‘आज काय घालायचं?’ या नेहमीच्या प्रश्नाचाही सामना करताना दिसते. काळा टॉप आणि लाल पँट असा साधा लूक करून ती लॅपटॉप बॅग आणि इअरबड्स घेऊन ऑफिससाठी निघते.

सकाळी साडेदहा वाजता उमंगा गुगलच्या कॅम्पसमधील जिममध्ये पोहोचते. ट्रेडमिलवर व्यायाम आणि स्ट्रेचिंग केल्यानंतर ती कामाला सुरुवात करते. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ती आपल्या डेस्कवर लॅपटॉप, नोटपॅड आणि कागदपत्रांसह काम करताना दिसते. रॅम्पवर आत्मविश्वासाने वावरणाऱ्या उमंगाचा हा कॉर्पोरेट अवतार पाहून तिचे फॉलोअर्सही प्रभावित झाले आहेत. तिच्या मते, आयुष्यात आपण काय साध्य करू शकतो याला मर्यादा नसते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडता येतात, हा संदेशही तिच्या प्रवासातून पाहायला मिळतो.