अरबी समुद्रात हिंदुस्थानी युद्धनौकेला पाकिस्तानी जहाजाची धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

अरबी समुद्रात हिंदुस्थानी नौदलाच्या युद्धनौकेला पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाची धडक झाल्याची घटना समोर आली आहे. १५ सप्टेंबरच्या संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर हिंदुस्थानने पाकिस्तानच्या उच्चायोगातील प्रभारी राजनयिकाला परराष्ट्र मंत्रालयात बोलावून तीव्र निषेध नोंदवला.

हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, हिंदुस्थानी नौदलाचे युद्धनौके नियमित निगराणी मोहिमेवर असताना पाकिस्तानी नौदलाचे जहाज वेगाने त्याच्या जवळ आले त्यानंतर दोन्ही जहाजांची धडक झाली. ही घटना आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घडली. या घटनेत कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याचे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे.

सदर घटनेची गंभीर दखल घेत हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने १६ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाच्या प्रभारी अधिकाऱ्याला बोलावले. पाकिस्तानी नौदलाच्या या वर्तनाचा हिंदुस्थानकडून निषेध नोंदवण्यात आला. तसेच संबंधित अधिकाऱ्याला हा संदेश पाकिस्तानच्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्यास सांगण्यात आले.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार हिंदुस्थानने या घटनेचा संबंध एप्रिल १९९१ मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या लष्करी कवायती, युद्धाभ्यास आणि सैन्याच्या हालचालींबाबतच्या आगाऊ सूचनेच्या कराराच्या कलम १० शी जोडला आहे. या करारातील तरतुदींचे पालन करून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्व लष्करी तुकड्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे हिंदुस्थानकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, इस्लामाबादमधील भारताच्या प्रभारी राजनयिकालाही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे या घटनेबाबत असाच निषेध नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून या घटनेवर तत्काळ अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.