
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री फडणवीस हे पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी गेले असता, बाहेर जमलेल्या मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.
साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी आंदोलकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, तसेच ‘यांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थितीचे गांभीर्य आणि मुख्यमंत्र्यांची सुरक्षा लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आक्रमक झालेल्या काही मराठा आंदोलकांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.





























































