
राज्यातील आदिवासी भागातील शाळांची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘आदिवासी स्पूल ठीक करो’ अभियान उद्या, गुरुवारपासून गडचिरोलीतून सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली.
दिपके यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील आदिवासी शाळांच्या सद्यस्थितीबाबत विविध आकडेवारी सादर केली. अनेक शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साधनांची कमतरता असल्याचा दावा त्यांनी केला. आदिवासीबहुल जिह्यांमधील शाळांच्या परिस्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे दिपके म्हणाले. शाळांमधील सुविधांचा अभाव हा केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न नसून त्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अभियानाची सुरुवात गडचिरोली जिह्यातून करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील शाळांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेण्यात येणार आहे. शाळांमध्ये शिक्षकांची स्थिती, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱया अडचणी आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
























































