
अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांना नोकरी करणे अवघड होणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी नवे धोरण आणले असून शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल 96 लाख रुपये म्हणजेच 1 लाख डॉलरचे शुल्क भरावे लागू शकते. हे शुल्क ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी प्रस्तावित आहे.
या प्रस्तावाला व्हाईट हाऊसची मंजुरी मिळाली आहे. तथापि, हा नियम अद्याप लागू झालेला नाही. लागू करण्यापूर्वी या प्रकरणी जनता व संस्थांकडून आक्षेप आणि सूचना मागवल्या जातील. ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग अमेरिकेत शिक्षण घेणाऱया परदेशी विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण झाल्यावर काम करण्याची परवानगी देते. या अंतर्गत पदवीधर विद्यार्थ्यांना साधारणपणे 12 महिन्यांपर्यंत नोकरी करण्याची मुभा मिळते. सध्या ओपीटीसाठी शुल्क 40 हजार रुपये आहे. प्रस्तावित 1 लाख डॉलरचे शुल्क लागू झाल्यास विद्यार्थ्यांना सध्याच्या शुल्कापेक्षा अनेक पटींनी जास्त रक्कम भरावी लागेल. अमेरिकेत शिक्षण घेणाऱया परदेशी विद्यार्थ्यांसाठी हा खर्च टय़ूशन फी आणि राहण्या-खाण्याच्या खर्चाव्यतिरिक्त असेल.
































































