
एक मत काय करू शकते, याची प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या राजस्थानच्या नगरपालिकेमधील निवडणुकीत आली आहे. भरतपूर जिह्यातील नदबई नगरपालिकेत अवघ्या एका मताच्या फरकाने उमेदवाराचा विजय झाला. अपक्ष उमेदवार जगदीश प्रसाद यांनी भाजप उमेदवार रामशरण यांचा केवळ एका मताने पराभव केला. परंतु, या विजयाचा गुलाल उधळण्यापूर्वीच विजयी उमेदवाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण, विजयी उमेदवार जगदीश प्रसाद यांच्या आईचे निधन झाले.
नदबईच्या प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणूक सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीची झाली. मतमोजणीवेळी प्रत्येक फेरीला दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली. शेवटी अपक्ष उमेदवार जगदीश प्रसाद यांना एकूण 151 तर भाजपच्या रामशरण यांना एकूण 150 मते मिळाली. यामुळे अवघ्या एका मताच्या फरकाने जगदीश प्रसाद यांचा विजय झाला. मतदानाच्या दिवशी जगदीश प्रसाद यांच्या वृद्ध आईचे निधन झाले. परंतु, त्यांनी त्याआधी आपल्या मताचा अधिकार बजावला होता. जगदीश प्रसाद यांचा विजय अवघ्या एका मताने झाला आणि त्यांच्या आईने निधनापूर्वी दिलेले हेच मत त्यांच्या विजयाला निर्णयाक ठरले, अशी चर्चा आता केली जात आहे. आईच्या एका मतामुळे मुलगा नगरसेवक बनला, अशी चर्चा आता नदबईच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये केली जात आहे.


























































