
बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवले आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाबरोबरच ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गद्दार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांचा विश्वासघात करून काही आमदारांनी त्यांची साथ सोडली. या गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. ममतांच्या पक्षाने या दाव्याला आव्हान दिले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली. हा वाद सुरू असतानाच बंगालमधील नंदीग्राम व रेजीनगर मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा झाली. या पोटनिवडणुकीत गद्दार गटानेही आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांनीही तृणमूलच्या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे निवडणूक चिन्हाचा पेच निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून आयोगाने हे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा अंतरिम आदेश दिला. अनेक वर्षे संघर्ष करून स्वतःचा पक्ष उभा करणाऱया ममतांसाठी हा धक्का मानला जात आहे.
पक्षाच्या नव्या नावांसाठी उद्या 11 वाजेपर्यंत मुदत
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपापल्या पक्षाच्या नवीन नावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत हे तीन पर्याय द्यावे लागणार आहेत. उमेदवारांसाठी मुक्त चिन्हांच्या यादीतून कोणतीही तीन पसंतीची चिन्हे निवडता येणार आहेत.


























































