
अमेरिकेतील वायोमिंग राज्यात एका 28 वर्षीय पंजाबी शीख ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. इंटरस्टेट 80 वरील बिटर क्रीक रेस्ट एरियामध्ये या चालकावर तब्बल 17 वेळा चाकूने वार करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या मानेला, छातीला, हातांना आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची विशेष चर्चा होत आहे कारण काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (DHS) ‘मिस्टर सिंग’ असा उल्लेख असलेली एक वादग्रस्त AI-निर्मित पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये शीख व्यक्तीचे चित्र दाखवत स्थलांतरित ट्रक चालकांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप झाला होता.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार ‘सिंग’असे या ट्रकचालकाचे नाव आहे. रविवारी पहाटे तो बिटर क्रीक रेस्ट एरियातील बाथरूममध्ये गेला होता. त्यावेळी एका व्यक्तीने त्याचा पाठलाग करत बाथरूममध्ये प्रवेश केला आणि अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोराने वारंवार चाकूने वार केल्यानंतरही चालकाने कसेबसे बाथरूममधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बाहेर आल्यानंतर तो खाली कोसळला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला.
ट्रक चालकाच्या मदतीसाठी रेस्ट एरियामध्ये असलेले एका हिस्पॅनिक कुटुंबातील सदस्य धावून आले. त्यांनी त्याच्या जखमांवर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला आणि वैद्यकीय मदत बोलावली. या कुटुंबाने पोलिसांना संशयिताच्या ट्रकबाबतही माहिती दिली. माहिती मिळताच वायोमिंग हायवे पेट्रोलने तपास सुरू केला. रेस्ट एरियापासून सुमारे 113 किलोमीटर अंतरावर रॉलिन्सजवळ संशयिताचे वाहन अडवण्यात आले. पोलिसांनी अँड्र्यू ख्रिस बझडॅक याला अटक केली आहे.


























































