
गौराईच्या आगमनाने संगमेश्वर तालुक्यातील वाड्या- वस्त्यांमध्ये भक्तीचा दरवळ पसरला असतानाच यादववाडीतील जाखडीच्या ठेक्याने उत्सवाला अक्षरशः रंगत आली. गौराईच्या स्वागतासाठी एकत्र आलेल्या पुरुष मंडळींनी पारंपरिक जाखडी नृत्य सादर करत कोकणच्या मातीत रुजलेल्या लोककलेचा जागर केला.
ढोलकीचा घुमणारा नाद, पारंपरिक गीतांचे सूर आणि त्यावर थिरकणारी पावले यामुळे यादववाडीतील वातावरण भारावून गेले. जाखडीच्या प्रत्येक ठेक्यासोबत उत्साह वाढत गेला आणि उपस्थित ग्रामस्थही या लोककलेच्या जल्लोषात सहभागी झाले.
गौराई म्हणजे माहेरवाशिणीच्या आगमनाचा आनंद; आणि त्या आनंदाला जाखडीच्या तालाची साथ मिळाल्याने यादववाडीतील उत्सवाला एक वेगळीच झळाळी आली. घराघरांत गौराईचे पूजन सुरू असताना वाड्यातील पारंपरिक जाखडीने संपूर्ण वातावरणात उत्साहाचे चैतन्य निर्माण केले.
संगमेश्वर तालुक्यातील धामणीच्या वाड्या-वस्त्यांमध्ये आजही नमन, जाखडीसारख्या लोककला केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर परंपरा, संस्कृती आणि गावच्या एकोप्याचा वारसा म्हणून जपल्या जात आहेत. यादववाडीतील जाखडी सादरीकरणातून याच संस्कृतीचे जिवंत दर्शन घडले.गौराईच्या स्वागताला भक्तीची जोड, जाखडीला उत्साहाची साथ अन् यादववाडीच्या अंगणात रंगलेला कोकणी जल्लोष—असा अविस्मरणीय ठरला गौराईचा सोहळा!



























































