
अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बहुचर्चित सांबरकुंड धरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मोबदला अद्याप निश्चित झालेला नसताना ठेकेदाराने यंत्रसामग्री धरण क्षेत्रात आणली आहे. या प्रकाराला स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी कडाडून विरोध करून प्रथम मागण्या मान्य करा, मागण्या मान्य झाल्या नाही तर सांबरकुंड प्रकल्पाचा एक दगडही रचू देणार नाही, असा इशारा दिला आहे. शासनाच्या या मनमानीविरोधात लढा उभारण्याचा निर्धारही प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
अलिबाग तालुक्यातील रामराज, महान परिसरात सांबरकुंड मध्यम प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ४ हजार ३१४ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून परिसरातील २४ गावांना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धरणात ४९.८५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी जांभूळवाडी, खैरवाडी, सांबरकुंडवाडी येथील १०३.८१ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात आले आहे. यामध्ये खरीप ५२.०९, वरकस ३९.४६, पोट खराब १२.२६ जमिनींचा समावेश आहे. प्रकल्पामुळे तीन वाड्यांवरील २०८ कुटुंबांचे पुनर्वसनही करावे लागणार आहे. २०१३ पूर्वीच्या भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार असून या भूसंपादन प्रक्रियेला प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी शासन दरबारी लावून धरली आहे.
आंदोलनाची रणनिती आखण्यासाठी बैठक
भूसंपादनाचा मोबदला अद्याप निश्चित झालेला नसताना महालक्ष्मी इन्फ्रा प्रोजेक्टची यंत्रणा सांबरकुंड प्रकल्प क्षेत्रात पोहोचली आहे. यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी महानवाडी येथील श्री राधा कृष्ण गणेश मंदिरात सांबरकुंड मध्यम प्रकल्पबाधितांनी आंदोलनाची रणनिती आखण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या भावना व्यक्त केल्या




























































