
वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर रोडवरील प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. गायमुख घाटामध्ये आज तुफान वाहतूककोंडी झाल्याने गाड्यांच्या सहा किमीच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात वाहनचालक व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मोठे कंटेनर, कार, बाईक, एसटी बसेस, रिक्षा यांचा जणू जांगडगुत्ता झाला होता.
कासारवडवलीचा पूल बंद असल्याने कोंडीत भर
कासारवडवली जंक्शन येथे कोट्यवधी रुपये खर्च करून एमएमआरडीएने भलामोठा पूल बांधला. मात्र उद्घाटनानंतर लगेच या पुलाला तडे गेल्याने काही दिवसांपासून तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे पुलावरून जाणारे मोठे कंटेनर्स व अन्य गाड्या या मूळ रस्त्यावरूनच जात असल्याने घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीत भर पडली.




























































