‘ऑपरेशन सिंदूर’ने दिलेली जखम भळभळतीच, पाकिस्तानचा हवाई तळ अजूनही नादुरुस्तच; सरगोधावर हवाई दलाचा अचूक निशाणा, उपग्रह छायाचित्रातून स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी हवाई दलाने मोठे शौर्य दाखवत ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानातील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले होते. याशिवाय सरगोधा येथील हवाई तळदेखील उद्ध्वस्त केला होता. हवाई दलाचा हा निशाणा एवढा अचूक होता की तब्बल 16 महिन्यांनंतरदेखील पाकिस्तानला हा तळ पूर्णपणे दुरुस्त करता आलेला नाही. सरगोधा येथील धावपट्टीची अजूनही डागडुजी करण्यातच पाकिस्तान व्यस्त आहे. उपग्रहावरून प्राप्त झालेल्या छायाचित्रातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

‘व्हेंटॉर’ या उच्च क्षमतेच्या उपग्रहाने 12 सप्टेंबर रोजी सरगोधा येथील काही छायाचित्रे टिपली होती. सरगोधा येथील हवाईतळ लाहोरपासून 172 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी दुरुस्तीचे काम अजूनही सुरू असल्याचे या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. हिंदुस्थानी हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानाद्वारे हवेतून डागलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सुमारे 300 किलोमीटर अंतरावरून सरगोधा हवाई तळावरील धावपट्टीचा अचूक वेध घेतल्याचे सांगण्यात येते. हिंदुस्थानने नेमक्या कोणत्या अस्त्राचा वापर केला, हे उघड केलेले नाही. मात्र, ते ब्रह्मोस हेच क्षेपणास्त्र असावे, असे संरक्षण क्षेत्रातील तज्ञ सांगतात.

मोक्याच्या जोडणीवर भेदक मारा

हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्राने सरगोधा येथील धावपट्टी आणि ‘टॅक्सी-ट्रक’च्या अगदी मोक्याच्या जोडणीवर अचूक आणि भेदक मारा केला. यामुळे तेथे मोठा खड्डा पडला होता. तो तात्पुरता बुजवण्यात आला होता. मात्र, तो कमपुवत होता. त्यामुळे धावपट्टीसह टॅक्सी-ट्रकची संपूर्ण जागा खोदून नव्याने पक्की धावपट्टी तयार करावी लागत आहे. त्यामुळे 16 महिन्यांनंतरदेखील पाकिस्तानला केलेली जखम भरून निघालेली नाही.