तेलंगणातील रुग्णालयात भीषण आग, तीन नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणातील आदिलाबाद येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर 28 बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले. एसी युनिटमध्ये स्फोट झाल्यानंतर आग भडकली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे; मात्र आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

भीषण आगीच्या या दुर्घटनेत तीन निष्पाप बालकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये अवघ्या पाच दिवसांच्या एका नवजात बालकाचा जागीच मृत्यू झाला; तर दुसऱ्या बालकाने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. आगीतून सुमारे 28 बालकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यापैकी काही बालकांना धुराचा त्रास झाल्याने श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्या.

आरोग्यमंत्री दामोदर राजा नरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 बालकांना खासगी रुग्णालयात, तर आणखी दोन बालकांना पुढील उपचारांसाठी निजामाबाद येथे हलवण्यात आले. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करीत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.