
केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांवर आणि कामकाजाच्या पद्धतीवर सह-निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 10 महिन्यांत या दोन आयुक्तांनी आयोगाच्या विविध निर्णयांवर तब्बल 14 वेळा लेखी स्वरूपात आपले आक्षेप नोंदवल्याचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केले. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अर्थात एसआयआरवरून निवडणूक आयोगात मदभेद झाल्याचे समोर आले आहे. बिहारमधून जून 2025 मध्ये सुरू झालेली ही मोहीम पुढे इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान आणि इतर प्रशासकीय बाबींमध्ये दोन सह-आयुक्तांना अंधारात ठेवून निर्णय घेण्यात आला.
काही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी आपली कोणतीही पूर्वकल्पना किंवा संमती घेतली गेली नाही, असा दावा दोन्ही आयुक्तांनी केला असून याबाबत लेखी आक्षेपही नोंदवण्यात आले. नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म 6मधील बदल, मतदार यादीतून नावे कमी करणे किंवा नवीन नावे जोडण्याची प्रक्रिया यावर दोन्ही आयुक्तांनी प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी हे दोघेही सनदी सेवेतील अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत.
ज्ञानेश कुमार यांना हटवा, तुरुंगात पाठवा, उद्धव ठाकरे यांची मागणी
कोण आहेत डॉ. सुखबीर सिंग संधू?
डॉ. संधू हे 1988 च्या बॅचचे उत्तराखंड कॅडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत. 15 मार्च 2024 रोजी त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी जुलै 2021 ते जानेवारी 2024 या काळात उत्तराखंडचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले. याशिवाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना देशभरात फास्टॅग प्रणाली यशस्वीपणे लागू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. केंद्रात उच्च शिक्षण विभागात अप्पर सचिव आणि लोकपालचे सचिव म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. 2007 ते 2014 या काळात तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या 4 मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सचिव म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. डॉ. संधू हे पेशाने एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांनी इतिहासात एम.ए आणि कायद्याची पदवीही घेतली आहे. राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू राहिलेल्या संधू यांनी उत्तराखंडमधील 22 हजार फूट उंच ब्लॅक पीक शिखरही सर केले आहे.
ज्ञानेश कुमार हे निवडणूक घेत नसून आधीच स्क्रिप्ट लिहित आहेत; अभिजीत दीपके यांचा हल्ला
कोण आहेत डॉ. विवेक जोशी?
डॉ. जोशी हे 1989 च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे माजी आयएएस अधिकारी असून त्यांनी 19 फेब्रुवारी २2025 रोजी निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. निवडणूक आयुक्त होण्यापूर्वी ते हरियाणाचे मुख्य सचिव होते. केंद्रात त्यांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव, वित्तीय सेवा विभागाचे सचिव तसेच हिंदुस्थानचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांसारखी अत्यंत जबाबदारीची पदे सांभाळली आहेत. रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँकेच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केले आहे. डॉ. जोशी यांनी रुडकी विद्यापीठातून (आताचे आयआयटी रुडकी) मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले आहे. त्यानंतर स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा येथील ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमधून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र विषयात एम.ए. आणि पीएचडी संपादन केली आहे.
अमित शहा, ज्ञानेश कुमार यांनी देशाचं वाटोळं केलं; संविधानाशी इतका मोठा खेळ गेल्या 80 वर्षांत कुणी केला नाही! शिवसेना नेते, खासदार @rautsanjay61 यांनी घेतला खरपूस समाचार pic.twitter.com/FdGJUTgMen
— Saamana Online (@SaamanaOnline) September 23, 2026



























































