आभाळमाया – आकाश नकाशे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

कालच विषुवदिन झाला. म्हणजे सूर्य आसमान भ्रमण करत करत पृथ्वीच्या विषुववृत्तावर तळपत राहिला. यापुढे तो 23 डिसेंबरपर्यंत हळूहळू पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील ‘मकरवृत्ता’पर्यंत जाईल आणि मग पुन्हा त्याचं ‘उत्तरायण’ सुरू होईल. डिसेंबरातला हा उत्तरायण दिनच आपल्या देशातील आकाश निरीक्षकांनी खगोल दिन म्हणून साजरा करायला हवा. कारण ती वर्षातली सर्वात मोठी रात्र तारांगण पाहण्यासाठी जवळपास 13 तास देणारी असेल. कालची रात्रबरोबर 12 तासांची होती. आता रात्रींचा कालावधी वाढणार. पावसाळाही लवकरच ओसरणार. तेव्हा अवकाश निरीक्षणाचा हंगाम सुरू व्हायला हरकत नाही. तत्पूर्वी येत्या दोनेक आठवड्यांत काय तयारी करता येईल ते लक्षात घेऊ. ऑक्टोबर हीटमध्ये अतिउष्णतेपासून बचाव करण्यासाठी टोपी वगैरे वापरायला विसरू नका. कारण दुर्बिण घेऊन फिल्डवर दिवसाच जावं लागतं.

पूर्वतयारी म्हणून थोडासा अभ्यास म्हणजे ऑक्टोबरपासून कोणत्या राशी, नक्षत्र, ग्रह मावळतीला दिसतायत त्याचा अंदाज घेऊ या. आकाश नकाशे हल्ली विविध ‘स्कायमॅप’ अॅपवर उपलब्ध असतात. आपण जिथून आकाशदर्शन करणार त्या जागेचे अक्षांश-रेखांश म्हणजेच ‘कोऑर्डिनेट’ आणि वेळ टाकला की, डोक्यावरचं आकाश स्क्रीनवर दिसू लागेल. मावळतीचं आकाश आधी का पाहायचं याचं कारण म्हणजे उगवतीचं आकाश पुढे बराच वेळ दिसणार आहे, परंतु पश्चिम क्षितिजावर जे ग्रह, तारकासमूह असतील ते लवकरच अस्त पावतील म्हणून त्यांची यादी हाती हवी.

कोणत्याही ताऱयाचे किंवा खगोलीय ‘वस्तू’चे अवकाशातील नेमके ‘ठिकाण’ कसे शोधायचे? त्यासाठीच आधी उल्लेख केलेली कोऑर्डिनेट सिस्टिम किंवा निर्देशांक पद्धत वापरावी लागते. याचे तीन प्रकार आहेत. स्थानिक पद्धत, आयनिक पद्धत आणि वैषुविक पद्धत. निरीक्षक म्हणून आपण अवकाशाकडे पाहू लागलो तर सर्व बाजूंच्या क्षितिजांचं दर्शन घडवणारा अवकाशाचा अर्धगोल दिसतो. उरलेला पृथ्वीच्या दुसऱया (दक्षिण) भागातून दिसेल. आता आपण मुंबईतून किंवा महाराष्ट्रातून कुठूनही आकाशदर्शन करणार असलो तर महाराष्ट्र साधारण 17 ते 20 उत्तर अक्षांशांमध्ये येतो. मुंबई परिसर 19 अंश उत्तर अक्षांशावर आहे. साहजिकच मुंबईतून ध्रुवतारा क्षितिजापासून 19 अंश उंचीवर, तर नागपूरहून तो थोडा अधिक वर दिसेल. निरीक्षकाच्या डोक्यावरचा अवकाशाचा बिंदू म्हणजे शिरोबिंदू. त्याला ‘ख’मध्य म्हणतात (झेनिथ).

दक्षिण आणि उत्तर दिशांच्या बिंदूंना जोडणारी रेषा शिरोबिंदूतून जाते त्याला मध्यमंडल म्हणतात. प्रत्येक तारा एका दिवसात एकदा मध्यमंडल ओलांडून जातो. क्षितिजावर उत्तर-पूर्व अशी गोलाकार फिरवली तर ते झाले 0 ते 360 ‘क्षित्यंश’ किंवा ‘ऑझिम्युथ’ म्हणतात. त्याच वेळी उन्नतांश म्हणजे निरीक्षक ते डोक्यावरील 90 अंश हे अंतर (झेनिथ डिस्टन्स) म्हणजे ‘उन्नतांश’ एखादा तारा निरीक्षकाच्या उजवीकडे क्षितिजापासून किती उंचीवर आहे त्यावर त्याचे स्थान सांगता येते. दुसरी पद्धत आयुनिक. वैषुविक वृत्ताचे अक्षांश-रेशांख (सेलेस्टिअल लॅटिटय़ूड-लॉन्जिटय़ूड) वापरून आकाशस्थ तारे दाखवता येतात.

यामध्ये सर्वात योग्य पद्धत वैषुविक. अवकाशातील काल्पनिक वैषुविक वृत्ताचा वापर यात केला जातो. जगभर हीच पद्धत वापरली जाते. कारण पृथ्वीवरून कुठूनही एखाद्या ताऱयाचे निर्देशांक सांगता येतात. दूरस्थ व्यक्तीलाही एखाद्या ताऱयाच्या ठिकाणाची कल्पना येते. म्हणूनच सिलेस्टिअल सिस्टिम सर्वोत्तम. मात्र या सर्व अवकाश निरीक्षण पद्धती नुसत्या वाचनाने समजतीलच असं नाही. पोहण्याचा ‘क्लास’ पाण्यातच घ्यावा लागतो तसाच आकाश निरीक्षणाचा आणि अवकाश नकाशांचा अभ्यास करायला मोकळ्या निरभ्र आकाशाखाली काळोख्या रात्री जायला हवं. ही केवळ थिअरी नव्हे, तर प्रॅक्टिकल अधिक महत्त्वाचं. प्रदीप नायक यांच्यासारखे तज्ञ आमच्या खगोल मंडळात या सर्व गोष्टी शिकवतात. अवकाश नकाशे हाती आले की, त्यातील तारकासमूह (नक्षत्र) तसेच राशींचे आकार लक्षात ठेवले तर निरीक्षण सोपं जातं. ते सोपं व्हावं म्हणून त्याच्याशी काही कथा परंपरेने जोडल्या आहेत. वास्तविक त्या कथांचा आणि कथापात्रांचा अवकाशातील ताऱ्यांशी काहीच संबंध नसतो. म्हणूनच विविध संस्कृतींत एकाच तारकासमूहाचा आकार विविध कथा घेऊन येतो. प्रसिद्ध ‘मृग’ नक्षत्राचा आकार आपण हरणासारखा दाखवतो, तर ग्रीक लोक तोच आकार शिकाऱयाच्या स्वरूपात दाखवतात.

एका तारकासमूहाच्या ‘आकारा’तले तारे एका ‘पातळी’वर किंवा समतल चित्रासारखे नसतात. ते खूप दूर असल्याने तसे केवळ भासतात. ते कसे ते सोप्या प्रयोगाने दाखवता येते. एका कार्डबोर्डवर कमी-अधिक उंचीच्या टाचण्या टोचून एखाद्या आकार तयार केला आणि तो दूरवरून पाहिला तर टाचण्यांची ‘डोकी’ समपातळीवर दिसतील. तसाच हा तारकीय अंतरांचा प्रकार.

साध्या सोप्या शब्दात खगोलशास्त्र समजावण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यातून आजपर्यंत हजारो प्रेक्षकांना आपल्या विराट विश्वाची जाणीव झाली आहे. त्यासाठीच आकाश नकाशेही महत्त्वाचे.