गणपती गेले गावाला… मुंबईच्या रस्त्यांवर भक्तिसागर, 35,680 गणेशमूर्तींचे वाजतगाजत विसर्जन; कृत्रिम तलावांकडेही ओढा वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर शुक्रवारी बाप्पा गावी निघाले. बाप्पाला निरोप देण्यासाठी अनंत चतुर्दशीदिनी चौपाटय़ांवर लाखोंचा जनसागर लोटला होता. ढोलताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत ‘गणपती बाप्पा मोरया…’ असा जयघोष करीत नाक्यानाक्यांवर जल्लोषात विसर्जन मिरवणुका निघाल्या. गणरायाला निरोप देताना भक्तांच्या डोळ्यांत पाणी आले. ‘चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी,’ म्हणत क्षमायाचना करत बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद घालण्यात आली. गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, वर्सोवा, मार्वे, गोराई, पवई तलाव येथे शनिवारी सायंकाळपर्यंत गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरूच होती.

शुक्रवारी सकाळपासून ते शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबईत समुद्र, खाडी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव आदी ठिकाणी 35,680 गणेशमूर्तींचे तर 560 गौरी/ हरतालिका यांचे विसर्जन करण्यात आले. ठिकठिकाणी गणेश मंडळानी बाप्पावर पुष्पवृष्टी केली. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांची गणेश विसर्जनासाठी सज्जता दिसून आली. जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त होता. समुद्र, चौपाटी, खाडी या ठिकाणी महापालिकेने जीवरक्षक तैनात केले होते. तसेच आपत्कालीन यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्थादेखील विसर्जनस्थळी 24 तास उपलब्ध करण्यात आली होती. गिरगाव चौपाटी येथे महापालिका प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. येथे 12 कृत्रिम तलाव, 20 निरीक्षण मनोरे, 22 तराफे, 90 प्रसाधनगृहे आणि दोन हजार मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. तसेच एक प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन रुग्णवाहिका, 548 फ्लडलाईट आणि 11 सर्चलाईटची व्यवस्था करण्यात आली होती.

मुंबईचा राजाचे बार्जद्वारे खोल समुद्रात विसर्जन

लालबाग गणेश गल्ली येथील ‘मुंबईचा राजा’च्या मिरवणुकीला शुक्रवारी सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. त्यापाठोपाठ लालबाग-परळमधील बाप्पांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. रात्री 9 वाजता मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आणि रात्री 11 वाजता बार्जद्वारे बाप्पाचे खोल समुद्रात विसर्जन करण्यात आले.

23 तासांनी ‘लालबागचा राजा’ला निरोप

शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास ‘लालबागचा राजा’चा भव्य विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली. विसर्जन मार्गात ठिकठिकाणी बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आणि सकाळी 11 वाजताच्या सुमारास विसर्जन करण्यात आले. ‘लालबागचा राजा’ची एक झलक पाहण्यासाठी विसर्जन मार्गावर आणि गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी झाली होती.

– यंदाच्या गणेशोत्सवात एकूण 1 लाख 99 हजार 185 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात 10 हजार 421 सार्वजनिक, 1 लाख 82 हजार 029 घरगुती, 6 हजार 735 गौरी/हरतालिका यांचा समावेश आहे

 – मुंबई महापालिकेने मुंबईतील विविध विसर्जन स्थळी एकूण 613 निर्माल्य कलश आणि 838 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत एकूण 934.26 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.