विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराची अफवा पसरली अन् उद्रेक झाला; पंजाबमध्ये विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रचंड तोडफोड, इमारत पेटवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील जालंधर-फगवाडा महामार्गावरील प्रसिद्ध लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार व तिच्या आत्महत्येची अफवा पसरल्याने तुफान उद्रेक झाला. संतप्त विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये प्रचंड तोडफोड करत इमारतीच्या एका भागाला आग लावली. तसेच जालंधर-फगवाडा राष्ट्रीय महामार्ग रोखल्यामुळे कित्येक तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

कॅम्पसमध्ये एका बांधकाम कामगाराने विद्यार्थिनीवर अत्याचार केला आणि त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने आत्महत्या केली, अशी माहिती तिच्या रुममेटने इतर विद्यार्थ्यांना दिली. या बातमीने संपूर्ण कॅम्पसमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी एकत्र आले आणि निदर्शने सुरू केली.

सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला काही वेळातच हिंसक वळण लागले. आंदोलकांनी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा, कुंड्या आणि आवारातील साहित्याची नासधूस केली. याच दरम्यान विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. मुख्य गेट उघडल्यानंतर काही समाजकंटकांनी कॅम्पसमध्ये प्रवेश करून जाळपोळ आणि तोडफोड केली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कपुरथलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव तोरा यांनी तातडीने पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. लैंगिक अत्याचार किंवा आत्महत्येसारख्या कोणत्याही घटनेची नोंद पोलिसांकडे झालेली नाही. हा संपूर्ण प्रकार अफवा आणि विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थ्यांमधील गैरसमजातून घडल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू असून मालमत्तेच्या नुकसानीचा पंचनामा करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तोरा यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नका – विद्यापीठ प्रशासन

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी प्रशासनाने अधिकृत पत्रक जारी करून सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. सोशल मीडियावर पसरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि समाजकंटकांनी पसरवलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही आंदोलनात सहभागी न होता आपल्या वसतिगृहात सुरक्षित राहावे व शांतता राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.