ओडिशात मुसळधार पावसाचा कहर; 70 हजारांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक भागांत अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन ओडिशा सरकारने शनिवारी सखल भागांतील 70 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. या नागरिकांची 395 मदत छावण्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यातील बालासोर, भद्रक, जाजपूर, मयूरभंज, कालाहांडी, कोरापुट, नबरंगपूर, मलकानगिरी, क्योंझर, नयागड, कंधमाल, बोलांगीर आणि जगतसिंहपूर या 13 जिल्ह्यांना पुराचा आणि पाणी साचण्याच्या समस्येचा फटका बसला आहे. बालासोर जिल्ह्यात पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. येथील तीन प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. सुवर्णरेखा नदीची पाणीपातळी शनिवारी सायंकाळी 5 वाजता जलेश्वर येथील राजघाट परिसरात 11.07 मीटरवर पोहोचली. नदीची धोक्याची पातळी 10.36 मीटर आहे. त्यामुळे भोगराई, जलेश्वर, बालियापाल आणि बस्ता या भागांतील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

महानदीच्या खोऱ्यात, विशेषतः छत्तीसगडमधील वरच्या भागांत मुसळधार पाऊस झाल्याने हिराकूड धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पूरग्रस्त भागांत बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. ओडिशा आपत्ती जलद प्रतिसाद दलाच्या (ODRAF) 33 तुकड्या, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) तीन तुकड्या आणि अग्निशमन दलाचे सुमारे ३०० पथक मदतकार्यात सहभागी झाले आहेत.