
तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यात शनिवारी एका घरात भीषण आग लागली. या आगीत घरातील 20 लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि घरातील इतर साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, बांदीवाडा गावातील बांदी अंजप्पा यांच्या घराला शनिवारी सकाळी 9.30 च्या सुमारास आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. कुटुंबाला सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही. आगीत नवीन घर बांधण्यासाठी ठेवलेली 20 लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि घरातील इतर वस्तू जळून खाक झाल्या.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. प्राथमिक तपासणीत, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील तपासानंतर आगीचे नेमके कारण निश्चित केले जाईल.























































