
पंजाबमधील फगवाडा येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री उशिरा मोठा गोंधळ घातला. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी विद्यापीठ परिसरात मोठी तोडफोड केली आणि विद्यापीठातील एका भागाला आग लावली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. ही कोंडी रविवारीदेखील कायम होती. बलात्कारपीडित विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा दावा
विद्यार्थ्यांकडून एक व्हिडीओही शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ त्या विद्यार्थिनीचा असून तिने बलात्काराची तक्रार वसतिगृहाच्या वॉर्डनकडे आणि व्यवस्थापनाकडे केली होती, मात्र त्यांनी दखल घेतली नाहीच, उलट तिला घरी पाठवून दिले. पीडित विद्यार्थिनी दोन दिवसांनी घरून विद्यापीठाच्या वसतिगृहात परतली. त्यानंतर त्याच रात्री तिने वसतिगृहाच्या छतावरून उडी मारून आपले जीवन संपवले, असा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे.



























































