11 वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला 5 वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

11 वर्षीय मुलीला वारंवार जवळ ओढून तिच्या अंगाला हात लावणे, पेटत्या मेणबत्तीने चटका देणे तसेच धमकी दिल्या प्रकरणी आरोपी रमेश जाधव (48) याला न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला पाच वर्षं कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणी आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा आरोपीविरोधात भादंवि कलम 354, 354(ब), 324, 506 तसेच पोक्सो कायदा 2012मधील कलम 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत 5 वर्षे सक्त कारावास व 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास; कलम 12 अंतर्गत 3 वर्षे सक्त कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास; तर भादंवि कलम 506 अंतर्गत 2 वर्षे सक्त कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून प्रांजली जोशी यांनी काम पाहिले.