मोड आलेली कडधान्ये, ओट्स आणि सॅलड खाल्ल्यावर पोटफुगी का होते? जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोड आलेली कडधान्ये, ओट्स आणि भाज्यांचे सॅलड हे फायबर, प्रथिने तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजांचे उत्तम स्रोत मानले जातात. मात्र, काही लोकांना हे आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगणे किंवा जडपणा जाणवू शकतो. यामागील कारणे काय आहेत, हे जाणून घेऊया. निरोगी राहण्यासाठी आहारात पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. फायबरयुक्त पदार्थ पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात ओट्ससारखे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

मोड आलेली कडधान्ये, ओट्स आणि सॅलडमध्ये फायबरसह अनेक पोषक घटक असतात. मात्र, हे पदार्थ अचानक मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास काही लोकांना पोट फुगणे, गॅस होणे किंवा पोटात जडपणा जाणवू शकतो. त्यामुळे शरीराच्या गरजेनुसार आणि मर्यादित प्रमाणातच या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, फायबर आतड्यांमध्ये पोहोचल्यानंतर तेथील जीवाणूंच्या मदतीने त्याचे किण्वन होते. या प्रक्रियेत गॅस तयार होऊ शकतो. ज्या लोकांच्या आहारात आधीपासून फायबरचे प्रमाण कमी असते, त्यांनी अचानक जास्त फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यास पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आहारातील फायबरचे प्रमाण हळूहळू वाढवावे. त्याचबरोबर पुरेसे पाणी पिणेही महत्त्वाचे आहे. यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते.

काही लोकांची पचनसंस्था संवेदनशील किंवा तुलनेने कमकुवत असते. अशा लोकांनी कच्चे सॅलड किंवा कच्चे मोड आलेले कडधान्य खाणे टाळावे. मूग किंवा हरभऱ्याचे मोड आलेले कडधान्य खात असाल, तर ते हलके उकडून किंवा वाफवून खाणे अधिक सोयीचे ठरू शकते.

सतत किंवा मोठ्या प्रमाणात पोट फुगत असेल, तर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट म्हणजेच पचनसंस्थेच्या आजारांवरील तज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काही वेळा पोटाशी संबंधित इतर समस्यांमुळेही अन्न पचण्यास अडचण येऊ शकते. तसेच काही विशिष्ट पदार्थांबद्दल शरीराची संवेदनशीलता असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच संबंधित पदार्थांचा आहारात समावेश करावा.

जास्त चरबीयुक्त, अतिमसालेदार पदार्थ आणि जंक फूडचे सेवन कमी करा. ताजे अन्न खाण्याला प्राधान्य द्या.

जेवणानंतर बडीशेप चावून खाऊ शकता किंवा बडीशेपचा चहा घेऊ शकता.

जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका किंवा बराच वेळ एकाच जागी बसून राहू नका. त्याऐवजी १० ते १५ मिनिटे चालावे.

आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करा.

जेवताना पूर्ण लक्ष खाण्यावर केंद्रित करा. अन्न व्यवस्थित चावून खा, जेणेकरून पचनास मदत होईल.

दिवसभर पुरेसे पाणी प्या. कमी पाणी प्यायल्यामुळे पचन बिघडू शकते आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

जास्त ताण घेतल्यामुळेही पचनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तणाव नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय करा.