
मिश्र रिलेमध्ये सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदक
हिंदुस्थानने 4 बाय 100 मीटर मिश्र रिलेमध्ये 41.06 सेकंदांच्या मोसमातील सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदक पटकावले. हिंदुस्थानच्या संघाने तिसरे स्थान मिळवले. चीनने 40.78 सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले.
पुरुषांच्या रिलेमध्ये कांस्य कमाई
हिंदुस्थानने पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये 3ः01.61 या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदक जिंकले. जपानने 3ः00.75 वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर कतारने 3ः00.93 वेळेसह रौप्यपदक पटकावले.
अंकुश पंघाल अंतिम फेरीत
अंकुश पंघालने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 80 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या फझलिद्दीन एर्किनबोएव्हला 4-1 ने पराभूत केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या अंकुशची सुरुवात खडतर झाली. एर्किनबोएव्हने पहिली फेरी 4-1 ने जिंकली. 75 किलो वजनी गटातील विद्यमान विश्वविजेता आणि सध्याच्या उझबेक बॉक्सरने सुरुवातीला लढतीवर नियंत्रण मिळवले, पण अंकुशने उल्लेखनीय पुनरागमन केले. दुसऱ्या फेरीत त्याने आपला वेग वाढवला आणि अचूक ठोसे मारून 3-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याने आपल्या हालचाली आणि कॉम्बिनेशन्सचा प्रभावीपणे वापर करून लढत आपल्या बाजूने वळवली. हा निर्णय विभाजित निर्णय होता, ज्यात पाचपैकी चार पंचांनी अंकुशच्या बाजूने निकाल दिला. या विजयामुळे अंकुशने सुवर्णपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो दुसरा हिंदुस्थानी बॉक्सर ठरला. यापूर्वी महिलांच्या बॉक्सिंगमध्ये 65 किलो वजनी गटात परवीनही अंतिम फेरीत पोहोचली होती.
व्हॉलीबॉलमध्ये कतारवर 3-2 असा विजय
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत हिंदुस्थानने उल्लेखनीय पुनरागमन कतारला 3-2 ने पराभूत केले. पहिले दोन सेट गमावल्यानंतर हिंदुस्थानी संघाने जबरदस्त चिकाटी दाखवत सामना निर्णायक पाचव्या सेटपर्यंत नेला. हिंदुस्थानने पहिले दोन सेट 26-28 आणि 25-27 असे गमावले होते. त्यानंतर संघाने पुनरागमन करत तिसरा सेट 25-23 आणि चौथा सेट 25-20 ने जिंकला. पाचव्या सेटमध्येही दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दबावाखाली हिंदुस्थानने उल्लेखनीय संयम दाखवत हा सेट 26-24 ने जिंकला. या प्रक्रियेदरम्यान हिंदुस्थानच्या संघाने नऊ मॅच पॉईंट्स वाचवले आणि एक रोमांचक विजय मिळवला.
सुमित नागल उपांत्यपूर्व फेरीत
पावसामुळे दोन दिवस चाललेल्या आणि जवळपास तीन तास चाललेल्या सामन्यात सुमित नागलने दक्षिण कोरियाच्या सेओंगचान हाँगचा 6-4, 6-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सुरुवातीला नागलला लय सापडण्यासाठी थोडा वेळ लागला, पण एकदा ती सापडल्यावर त्याने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आणि सामना हातातून निसटू दिला नाही. आता उपांत्यपूर्व फेरीत नागलचा सामना उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिनशी होईल.
तिरंदाजीमध्ये तिन्ही खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत
वैयक्तिक रिकर्व्ह प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत तीन हिंदुस्थानी तिरंदाजांनी प्रवेश केला आहे. महिलांच्या गटात अनिल कुमकुम महोदने उपांत्यपूर्व फेरीच्या आधीच्या फेरीत बांगलादेशच्या सलाह सलमा उद्दीनचा 6-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी तिने उत्कृष्ट कामगिरी केली, मात्र कीर्ती दक्षिण कोरियाच्या कांग चेयाँगकडून 3-7 ने पराभूत झाली. पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात दोन्ही हिंदुस्थानी तिरंदाजांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पात्रता फेरीत अव्वल ठरलेल्या धीरज बोम्मादेवराने 32 च्या फेरीत फिलीपिन्सच्या गिर्विन कलन नायजेलचा आणि 16 च्या फेरीत चायनीज तैपेईच्या चेंग शियांग-हुईचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. नीरज चौहाननेही एक मोठा धक्का दिला. त्याने 16 व्या फेरीत दक्षिण कोरियाच्या तीन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या किम जे देओकला 6-4 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
देव मीना पोल व्हॉल्टमध्ये राष्ट्रीय विक्रम
हिंदुस्थानच्या देव मीनाने पुरुषांच्या पोल व्हॉल्टच्या अंतिम फेरीत 5.50 मीटरच्या उडीसह नवीन वैयक्तिक सर्वोत्तम आणि राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. पण तरीही त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. फिलिपिन्सच्या अर्नेस्ट जॉन ओबिएनाने 5.91 मीटर उडी मारून आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक जिंकले. चीनच्या याओ जीने 5.70 मीटर उडीसह रौप्यपदक पटकावले, तर ली चेनयांगने 5.70 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक मिळवले. हिंदुस्थानचा दुसरा पोल व्हॉल्टर कुलदीप कुमार 5.35 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह दहाव्या स्थानावर राहिला.
अनुष्का यादव चौथ्या स्थानावर
हिंदुस्थानची अनुष्का यादव महिलांच्या हॅमर थ्रोच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर कायम आहे. तिचा चौथा प्रयत्न फाऊल ठरल्याने ती पदकाच्या स्थानापासून थोडक्यात दूर राहिली आहे. पदक विजेती जॉय आयरीस मॅकआर्थरपेक्षा अनुष्का खूप मागे होती.
तान्याची सर्वोत्तम कामगिरी तरीही पदक हुकले
महिलांच्या हॅमर थ्रोच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या तान्या चौधरीने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 64.02 मीटरचा थ्रो करून वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पण हा प्रयत्न त्यांना पदकाच्या शर्यतीत टिकवून ठेवण्यासाठी पुरेसा नव्हता. अनुष्का यादवचा दुसरा प्रयत्न फाऊल ठरला. ती सध्या आपल्या पहिल्या प्रयत्नात 64.29 मीटरच्या थ्रोसह पाचव्या स्थानावर आहे.
सायकलपटू पदकाच्या शर्यतीतून बाहेर
मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या सांघिक प्रिंट स्पर्धा तसेच महिलांच्या सांघिक पर्सूट स्पर्धेतून हिंदुस्थानी ट्रक सायकलिंग संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडले. महिलांच्या सांघिक स्प्रिंटमध्ये सेलेस्टिना, सरिता कुमारी, कीर्ती रंगस्वामी आणि त्रियाशा पॉल या चौघींनी त्यांच्या पहिल्या फेरीच्या हीटमध्ये 50.431 सेकंदांची वेळ नोंदवली. चायनीज तैपेईने ही शर्यत 49.504 सेकंदांत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या सांघिक स्प्रिंटमध्ये हिंदुस्थानच्या रोजित सिंग, डेव्हिड बेकहॅम, रोनाल्डो सिंग आणि जेम्स सिंग यांनी त्यांच्या पहिल्या फेरीच्या हीटमध्ये 44.374 सेकंदांची वेळ नोंदवली.
सर्फिंगमध्ये निराशा
हिंदुस्थानने आशियाई खेळांमधील आपली पहिली सार्ंफग मोहीम पदकाशिवाय संपवली. पुरुषांच्या शॉर्टबोर्ड उपांत्यपूर्व फेरीत बाद झालेला किशोर कुमार अनबरासू हा स्पर्धेतून बाहेर पडणारा शेवटचा हिंदुस्थानी खेळाडू ठरला.
























































