
डिजिटल स्कूल…. सेमी इंग्रजी… घरोघरी जाऊन विद्यार्थी वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न… मोफत गणवेश… शालेय पोषण आहार… यांसह विविध योजना राबवूनही रायगडातील मराठी शाळांच्या पटसंख्येची पाटी फुटली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढतच असल्याने रायगड झेडपीच्या चार शाळांना टाळे लागले असून रोडवणाऱ्या पटसंख्येमुळे जिल्ह्यातील आणखी २८ शाळांचे भवितव्य अंधारात आहे. पटसंख्या पडताळणीनंतर या शाळा सुरू ठेवायच्या की नाही याचा निर्णय होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षण हे तळागाळातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया मानला जातो. मात्र अलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना घरघर लागलेली पहावयास मिळत आहे. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अगदी शेवटच्या घटकातील पालक ही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये पाठवू लागला असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. पटसंख्येअभावी चालू शैक्षणिक वर्षात ४ जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
ऑनलाइन पोर्टलवर नोंदच नाही
शाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या २८ शाळांनी अद्यापपर्यंत शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरलेली नाही. यामुळे या शाळांची पटसंख्या • दिसून येत आहे. या शाळांसोबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून पत्रव्यवहार करण्यात आला असून या शाळांची पटसंख्या आहे की काही कारणामुळे ऑनलाइन पोर्टलवर विद्यार्थी पटसंख्या नोंद करता आली नाही. याची पडताळणी करण्यात येत आहे. पडताळणीनंतर पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे..
या शाळांचा समावेश
पटसंख्येअभावी २५/२६ या शैक्षणिक वर्षात २९ शाळा बंद झाल्या तर २०२६/२७ या शैक्षणिक वर्षात आतापर्यंत ४ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच २८ शाळांच्या पटसंख्येबाबत अद्याप साशंकता असून या शाळांमधील पटसंख्यांची पडताळणी केल्यानंतर या शाळांचे भवितव्य ठरणार आहे. बंद पडलेल्या शाळांमध्ये तळा तालुक्यातील गौळवाडी (काकडशेत), सुधागड भैरव, आंबोलीवाडी तसेच माणगाव तालुक्यांतील मुगवली या शाळांचा समावेश आहे.




























































