
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या भालगाव (ता. पाथर्डी) येथील निवासस्थानी आज पहाटे नाशिक व अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने छापा टाकला. पथकाने मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेत तपासणी केली असता, खेडकर कुटुंबाकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा सुमारे 13 कोटी 30 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली. याप्रकरणी खेडकर व त्यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांच्या विरोधात भ्रष्टचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
खेडकर यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी तक्रार अहिल्यानगर येथील पंढरीनाथ शंकर साबळे यांनी सन 2012मध्ये केली होती. या तक्रार अर्जावरून कारवाई करत लाचलुचपत विभागाच्या अहिल्यानगर येथील पोलीस निरीक्षक सविता तांबे यांनी खेडकर पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खेडकर यांनी सन 1995 ते 2023 या कालावधीत केलेल्या व्यवहाराची तपासणी पथकाने केली. या कारवाईत नाशिक, अहिल्यानगर व पाथर्डी पोलिसांच्या जवळपास चाळीस अधिकारी व कर्मचाऱयांनी सहभाग घेतला होता.
दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 1989 पासून सेवेत होते. मे 2023 रोजी ते सेवानिवृत्त झाले. मात्र, पथकाने 1995 ते 2023 या काळातील मालमत्तेची तपासणी केली. यात खेडकर कुटुंबाचे एकूण ज्ञात उत्पन्न 13 कोटी 2 लाख 78 हजार 775 रुपये, तर एकूण खर्च 15 कोटी 33 लाख 74 हजार 855 रुपये असल्याचे आढळून आले. तसेच ज्ञात मालमत्तेचे मूल्य 10 कोटी 99 लाख 85 हजार 616 रुपये असल्याचे आढळले.
11 ठिकाणी स्थावर मालमत्ता
कागदपत्रानुसार पथकाने एकूण 127 नोंदी तपासल्या. खेडकर यांच्या नावावर अहिल्यानगर, पुणे, हवेली, पवई, बारामती, भालगाव, मुळशी, औंध, पनवेल, खरवंडी कासार, शिरूर कासार आदी ठिकाणी स्थावर मालमत्ता असल्याचे आढळून आले. या शिवाय खेडकर व त्यांच्या पत्नीने कागदोपत्री घटस्फोट घेतला असल्याचे दिसून आले. मात्र, संपत्तीमध्ये दोघेही सामायिक भागीदार असल्याचेही दिसून आले. मध्यंतरीच्या काळात खेडकर यांची मुलगी पूजा खेडकर हिच्या अपंगत्वाच्या दाखल्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटला असताना आता खेडकर यांच्या आर्थिक उत्पन्नाचा वाद आता उफाळून आला आहे.




























































