
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडाने अवघे ठाणे हादरले. पूर्णेकर यांची हत्या शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला. या दोघांवरही गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी हजारोंच्या जमावाने कापूरबावडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रदीप पूर्णेकर यांचे हत्याकांड दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या हत्येतील मुख्य संशयित आणि कारस्थानाचे सूत्रधार माजी महापौर मीनाक्षी शिंदेंसह त्यांचे पती राजेंद्र शिंदेवर हत्येचा गुन्हा नोंदवा. त्यांना मोक्का लावून अटक करा, अशी जोरदार मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (37) यांची मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता गोळय़ा झाडून आणि शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पूर्णेकर रक्ताच्या थारोळय़ात कोसळले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रदीप पूर्णेकर यांची हत्या शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच सुपारी देऊन घडवून आणली, शिंदे पतीपत्नीच पूर्णेकर यांच्या हत्येचे मास्टर माइंड आहेत. मारेकरी फक्त मोहरे आहेत. त्यामुळे मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम व बंधू जयनाथ पूर्णेकर यांनी केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी मानपाडय़ातील हजारो नागरिकांनी प्रदीप पूर्णेकर यांचा मृतदेह कापूरबावडी पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या दिला. यामुळे कापूरबावडी, आझादनगर, मानपाडा परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते.
कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी मांडले ठाण
आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी राम पूर्णेकर, जयनाथ पूर्णेकर, शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, नगरसेवक शहाजी खुस्पे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, प्रदीप शिंदे, शहरप्रमुख अनिश गाढवे यांच्यासह कापूरबावडी पोलीस ठाण्यात जवळपास एक तास ठाण मांडले. जोपर्यंत मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर एफआयआर दाखल करत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हटणार नाही, असा इशाराच त्यांनी पालीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांना दिला. त्यावर चव्हाण यांनी चौकशी सुरू आहे, असे उत्तर दिले.
प्रदीप पूर्णेकरांची हत्या कॉन्ट्रक्ट किलिंगने
पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी राजेंद्र शिंदे आणि मारेकऱ्यांची मीटिंग नीळकंठ टॉवर येथे झाल्याचे पाहिले. त्यानंतर दोन दिवसांनी प्रदीप यांची हत्या झाली. ही हत्या कॉन्ट्रक्ट किलिंगने झाली आहे. कॉन्ट्रक्ट किलिंगमध्ये आरोपी कधीही सूत्रधाराचे नाव घेत नाही. कारण तू नाव घ्यायचे नाही, सहा महिने तुरुंगात रहा. तुला बाहेर काढण्याची जबाबदारी आमची, असे त्याला आश्वस्त केलेले असते. कॉन्ट्रक्ट किलिंगचा व्यवसाय असा चालतो. हे पूर्णेकर प्रकरणात चालणार नाही. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे या दोघांवरही हत्येचा गुन्हा, कारस्थानाचा गुन्हा, मोक्का दाखल करून अटक करावीच लागेल, अशी मागणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी केली.
शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांचे नाव पुरवणी जबाबात पोलिसांनी दाखल केल्यानंतर प्रदीप यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा मानपाडा येथील वैकुंठभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर व ठाणे शहरातील हजारो शिवसैनिक, रहिवासी व पूर्णेकर यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.
पोलीस आयुक्तांची भेट घेतली
कापूरबावडी पोलीस ठाण्यातून निघून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ठाण्यातील पोलीस मुख्यालयात जाऊन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली व प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
आरोपींची ओळख पटली
या हत्याकांडातील सर्व आरोपींची ओळख पटली आहे. या आरोपींची नावे पप्प्या शिंदे, संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली, निखिल यादव, नितेश पवार, आकाश निमसे अशी असल्याची माहिती सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.
सात गोळ्या झाडल्या
मारेकऱ्यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर एकूण सात गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या वर्मी बसल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
याप्रकरणाचा तपास वागळे इस्टेट गुन्हे शाखा पाचकडे वर्ग करण्यात आला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी दहा पथके तयार करण्यात आली आहेत. पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी या प्रकरणी कारवाईबाबत महत्त्वाची माहिती दिली. राजकीय, वैयक्तिक, आर्थिक किंवा इतर प्रत्येक गोष्टींची योग्य चौकशी केली जाईल असे ते म्हणाले. पाच पैकी चार आरोपींची ओळख पटली असून पप्प्या शिंदे याला अटक केल्याचीही माहिती त्यांनी दिली.
ठाण्याला स्वतंत्र राज्याचा, देशाचा दर्जा दिला आहे काय?
पूर्णेकरांची हत्या दडपण्याचा प्रयत्न कालपासून सुरू आहे. एफआयआरमध्ये आरोपींचे नाव घेत नाहीत. ठाण्याला स्वतंत्र राज्याचा, स्वतंत्र देशाचा दर्जा दिला आहे काय? इथला कायदा वेगळा आहे काय? असा संतप्त सवाल खासदार राऊत यांनी केला.
एमडी पावडर आणि क्लस्टरच्या अँगलने तपास करा
माझा भाऊ प्रदीप पूर्णेकर हा एमडी पावडरच्या धंद्याला कडाडून विरोध करत होता, त्यांच्याविरोधात लढत होता. या परिसरात सुरू असलेल्या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी रहिवाशांच्या बाजूने आवाज उठवत होता. त्यामुळेच त्याची हत्या घडवून आणली का? असा सवाल पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ यांनी केला. या प्रकरणाचा या अँगलनेही तपास करा, अशी मागणीही त्यांनी केली.
भाजपने केली सखोल चौकशीची मागणी
मनोरमनगर येथे प्रदीप पूर्णेकर यांची अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून खरी वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणावी, अशी मागणी भाजपने केली आहे. उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनी यासंदर्भात त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) यांना आज निवेदन दिले आहे. प्रदीप पूर्णेकर यांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम राबवली होती. अनधिकृत बांधकामांविरोधातही त्यांनी आवाज उठविला होता. त्यामुळे त्यांच्या हत्येप्रकरणी नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस विभागाने सखोल चौकशी करून हत्येमागील हेतू आणि खरी वस्तुस्थिती समोर आणावी असे पाटील यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मी माझी सीट मीनाक्षी शिंदेंसाठी सोडली, पण त्यांनी भयंकर कृत्य केले
मी मानपाडा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. ही सीट माझीच होती. भाजपने मला तिकीटही देऊ केले होते, परंतु मी ही सीट मीनाक्षी शिंदे यांच्यासाठी सोडली आणि त्या महापौर झाल्या. पण त्यांनी काय जाणीव ठेवली? माझ्या भावाची हत्या करून त्यांनी हे भयंकर कृत्य केले आहे, असा संतापही जयनाथ पूर्णेकर यांनी केला.


























































