
‘निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात इंडिया आघाडीतील सर्व पक्षांची भूमिका आणि मागण्या एकच आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने वेगवेगळे आंदोलन करण्याऐवजी सर्वांनी इंडिया आघाडीच्या बॅनरखाली एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारायला हवे,’ अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज इंडिया आघाडीच्या बैठकीत मांडली.
उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला ऑनलाइन उपस्थिती लावली. बैठकीला संबोधित करताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा व्हायलाच हवा अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, आयोगाच्या विरोधात होत असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘ज्ञानेश कुमारांच्या विरोधात सर्वच विरोधी पक्षांच्या भावना तीव्र आहेत. असे असताना प्रत्येक पक्षाने वेगवेगळे कार्यक्रम करणे योग्य नाही. महाराष्ट्रात काँग्रेस स्वतंत्र आंदोलने करत आहे. ही ‘एकला चलो’ची भूमिका ठीक नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

























































